

पुणे, पुढारी वृत्तसेवा: फॉरेक्स ट्रेडमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने दोन कोटींचा गंडा घालणार्या एकाला गुन्हेशाखेने वानवडी येथून बेड्या ठोकताना अपहाराचे दुबई कनेक्शन उघड केले. सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगांवकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
विक्रांत रमेश पाटील (25, रा. मोराळे, पलुस रोड, पलुस सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत स्वाती अभिजीत दांगट (36, रा. विश्व बंगलो, पंढरीनाथ कॉम्प्लेक्स, एनडीए रोड, शिवणे) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार 20 ऑगस्ट 2021 ते 27 ऑगस्ट 2021 दरम्यान प्रभात रोड येथील आरोपींच्या कार्यालयात घडला. तर मुख्य संशयीत आरोपी संतोषकुमार विष्णु गायकवाड (रा. पाण्याच्या टाकीजवळी, बनवडी, ता.खानापूर, सांगली) याच्यावर देखील महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयीत आरोपींची बेस्ट पाँईंट अम्पॅक्ट जनरल ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे पुण्यातील प्रभात रोड येथे कार्यालय आहेत. तर मुख्य संशयीत आरोपी सध्या दुबईत आहे. दोघेही मावस भाऊ असून त्यांनी फिर्यादीसह इतरांना फॉरेक्स ट्रेडमध्ये गुंतवणीकचे व चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्याच धर्तीवर फिर्यादी दांगट यांनी धनादेशाद्वारे 1 कोटी तर रोख स्वरूपात एक कोटी अशी रक्कम गुंतवली होती. परंतु, वारंवार मागणी करूनही रक्कम व त्यावरील परतावा न मिळाल्याने दांगट यांनी डेक्कन पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली होती. दरम्यान गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्यातील गुंतवणुकीची काही रक्कम गायकवाड याने त्याचा मावसभाऊ असलेल्या विक्रांत पाटील याच्या खात्यावर स्विकारल्याचे तपासात समोर आले. दरम्यान पाटील हा वानवडी परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी वानवडी येथून पाटीलला बेड्या ठोकल्या. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुधीर इंगळे, पोलिस नाईक राहुल सकट, पोलिस शिपाई राहुल होळकर यांनी ही कारवाई केली.
विक्रांत पाटील याच्या खात्यावर गुंतवणुकीतील मोठी रक्कम पाठवली गेली आहे. पाटील याला वानवडी येथून अटक केली असून मुख्य संशयीत आरोपी सध्या दुबई येथे आहे. या गुन्ह्यात आणखी गुंतवणूकदार देखील समोर येण्याची शक्यता आहे.
– नारायण शिरगांवकर, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे.