नागपूर : वादळी पावसात काँग्रेसचे अहिंसात्मक सत्याग्रह आंदोलन | पुढारी

नागपूर : वादळी पावसात काँग्रेसचे अहिंसात्मक सत्याग्रह आंदोलन

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : एकीकडे नागपुरात आज दुपारी अवकाळी वादळी पावसाने धुमाकूळ घातला असताना संविधान चौकात काँग्रेसचे अहिंसात्मक मार्गाने सत्याग्रह आंदोलन सुरू होते. भर पावसातले हे डोक्यावर खुर्ची घेत केलेले आंदोलन लक्षवेधी ठरले. ‘डरो मत’ असा राहुल गांधी यांच्या फोटोसह मोठा फलक लागलेल्या या आंदोलनाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली.

अखिल भारतीय काँग्रेस, प्रदेश काँग्रेस च्या आवाहनानुसार आज दिवसभर झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री आमदार सुनील केदार, शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक, जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उमेश शाहू, प्रकाश वसू, संदेश सिंगलकर, पिंटू बागडी आदींनी केले.

ओबीसींच्या नावाने भाजपची देशात नौटंकी – नाना पटोले

राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे थोतांड रचत भारतीय जनता पक्ष राज्यात व देशात आंदोलनाची नौंटकी करीत आहे. ओबीसी समाजाबद्दल भाजपला किती प्रेम आहे, हे आजवर दिसून आलेले आहे. निरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या, अदानी हे ओबीसींचे नाहीत, त्यांचा पुळका भाजपला येण्याचे काय कारण? ओबीसी समाजाला लुटून मुठभर मित्रांना देण्यासाठी ओबीसी समाजाने नरेंद्र मोदींना सत्तेत बसवलेले नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केला.

मोदी सरकारच्या काळात देशात महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, त्याचा फटका ओबीसी समाजालाही बसतो. ओबीसींची मते घेऊन भाजप व मोदी सरकार देशाला मनुवादाकडे घेऊन जाण्याचे काम करत असल्याचा आरोप विलास मुत्तेमवार यांनी यावेळी केला.

हेही वाचा 

Back to top button