नागपूर : महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण; गुन्हा दाखल | पुढारी

नागपूर : महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण; गुन्हा दाखल

नागपूर : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञास शिवीगाळ व मारहाण करून धमकी देण्यात आल्‍याची घटना सामोर आली आहे. ही घटना नागपूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत मौदा येथील पावडदौना रोड येथे (शनिवार) सकाळी घडली.

या प्रकरणी संशयीत आरोपी नरेंद्र श्रीराम दिघोरे विरुद्ध मौदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. मौदा येथील पावडदौना रोड भागातील सचिन अंबादास लारोकर या वीज ग्राहकाकडे सहा महिन्यापासून ११,७५० रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी होती. वीज बिल भरण्याबाबत महावितरणच्या वतीने ग्राहकाला वारंवार विनंती करण्यात आली होती.परंतु वीज ग्राहकाने वीज बिल न भरल्याने पुढील कारवाई करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ भीमराव जाधव व त्यांचे सहकारी रुपचंद ताराचंद शेंद्रे हे सचिन लारोकर यांच्या दुकानाजवळ गेले असता, दुकानाजवळ उभे असलेल्या नरेंद्र श्रीराम दिघोरे याने महावितरणच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच यापुढे लाईन कापण्यासाठी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी भीमराव जाधव यांच्या तक्रारीवरून मौदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button