बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : बुलडाणा येथील स्थानिक संगम तलाव स्मशानभूमीत दाहसंस्कार केलेल्या एका मृतदेहाची चक्क राख- अस्थिच चोरीला गेल्याचा धक्कादायक आणि अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. बुलडाणा येथील या अघोरी प्रकाराबद्दल पोलिस तपास करीत आहेत.
कुठे, कधी आणि कशाची चोरी होईल हे सांगता येत नाही. मंगळवार (दि. ५) सायंकाळी अमावस्या सुरू झाली. या पार्श्वभूमीवर शहरातील स्मशानभूमीत सोमवारी रात्री विचित्र व अघोरी चोरीची घटना घडली आहे.
यात स्थानिक संगम तलाव स्मशानभूमीत दाहसंस्कार केलेल्या एका मृतदेहाची चक्क राख आणि अस्थिच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मृताचे कुटुंबिय नातेवाईकांसह अस्थी सावटण्यासाठी स्मशानात पोहोचले तेव्हा सर्वांनाच प्रचंड धक्का बसला. जुने शहर परिसरातील संगीता संतोष सोनवणे (वय ४८) या महिलेचे अल्पशा आजारामुळे निधन झाले. स्थानिक स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतदेहाला दाह देण्यात आला होता. त्याजागी राख आणि अस्थी दिसून आली नाही. या अनपेक्षित घटनेने उपस्थितांना प्रचंड धक्का बसला. मृतदेहाची राख आणि अस्थी चोरीला गेल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली.
अंधश्रद्धेतून गुप्तधन, जादूटोणा आदी अघोरी कृत्यासाठी केलेला हा चोरीचा प्रकार असावा असा कयास नागरिकांतून व्यक्त होत आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तपासाला सुरुवात केली आहे.
पाहा व्हिडिओ : अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता अभियान