नागपूर: पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयात 2024 साली भाजपला मोठे यश मिळेल. यावेळी खासदार संजय राऊत यांना आपले अभिनंदन करावेच लागेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. 14 मार्चरोजी पक्षात मोठे प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपची सतत पराभवातून अधोगती झाली, हे सरकार लवकरच पडणार, असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
बावनकुळे म्हणाले की, पक्षातील राहिलेले आमदार सांभाळण्यासाठी खासदार राऊत यांना असे बोलावेच लागत आहे. मुळात अडीच वर्षात मुख्यमंत्री प्रश्न सोडवताना या आमदारांनी बघितलेच नाही. काही लोकांनी या काळात केवळ पैसा कमावला. मात्र, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सादर केला. यातून आपल्या भविष्याची चिंता या आमदारांना वाटत आहे. धास्तावलेल्या आमदारांना दिलासा देण्यासाठीच खासदार राऊत रोज असे उलट सुलट बोलत आहेत.
नागालँडमध्ये मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे, भाजपला नव्हे, अशी भूमिका घेणारा राष्ट्रवादी पक्ष हा दुतोंडी आहे. विधानसभा उपाध्यक्षपदी नरहरी झिरवळ यांना कायम ठेवणे यामागे भाजपाची छुपी युती तर नाही ना ? या प्रश्नावर शिंदे – फडणवीस यांना एका मिनिटात हा बदल करता आला असता. मात्र, भाजपचे हे संस्कार नाहीत राष्ट्रवादीने यातून शिकले पाहिजे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
हेही वाचा