नागपूर विभागातील विद्युतीकरणामुळे वार्षिक ३४२ कोटी रुपयांची बचत | पुढारी

नागपूर विभागातील विद्युतीकरणामुळे वार्षिक ३४२ कोटी रुपयांची बचत

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे होण्याच्या दिशेने मिशन मोडमध्ये कार्यरत आहे. सन २०३० पूर्वी “नेट झिरो कार्बन एमिटर” बनण्याच्या दिशेने भारतीय रेल्वे वाटचाल करीत आहे. या विभागात १००% विद्युतीकरण साध्य करून, रेल्वेने वाहतुकीची पर्यावरणपूरक पद्धत सुनिश्चित केली आहे. त्यामुळे आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी झाले असून देशासाठी मौल्यवान परकीय चलनाची बचत झाली आहे. याशिवाय, ट्रॅक्शन बदलांमुळे होणारा अडथळा टळून विभागीय क्षमता देखील वाढली आहे. तसेच १००% विद्युतीकरणामुळे वार्षिक इंधन बिलात सुमारे ३४२ कोटींची कपात झालेली आहे. त्याबरोबरच वार्षिक सुमारे १.०५ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. याविषयीची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी दिली.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ९७० रूटकिमी ( RKM) आणि २,३३२ ट्रॅककिमी (TKM) ब्रॉडगेज मार्ग आहेत. विभागाची एकूण स्थापित ट्रॅक्शन वीज पुरवठा क्षमता ७५४ MVA आहे ज्यामध्ये १७ ट्रॅक्शन सब स्टेशन समाविष्ट आहेत. इटारसी-नागपूर, नागपूर – बडनेरा, सेवाग्राम – बल्लारशाह, आमला – छिंदवाडा, नरखेड – चांदूर बाजार आणि वणी – पिंपळखुटी सेक्शनमधील रेल्वे विद्युतीकरण अनुक्रमे सप्टेंबर १९८९, फेब्रुवारी १९९१, सप्टेंबर १९८९, ऑगस्ट २०१७, ऑगस्ट २०१७ आणि फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण झाले. वणी – पिंपळखुटी दरम्यान सुमारे ६७ रूटकिमी ( RKM) च्या अंतिम पॅचचे विद्युतीकरण करून विभागाचे १००% विद्युतीकरण झाले. अजनी येथील इलेक्ट्रिक लोको शेडचे काम २२ सप्टेंबर १९९० रोजी सुरू झाले.

मुंबई – हावडा आणि दिल्ली – चेन्नई मार्गाच्या मुख्य मार्गावर नागपूर विभाग सामरिकदृष्ट्या स्थित आहे. ग्रँट ट्रंक एक्सप्रेस, गीतांजली, आंध्र प्रदेश एक्सप्रेस, केरळ एक्सप्रेस, बेंगळुरू-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, बिलासपूर- नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस, हजरत निजामुद्दीन-सिकंदराबाद राजधानी एक्सप्रेस आणि हिमसागर एक्सप्रेस या विभागातून जाणाऱ्या प्रमुख गाड्या आहेत. हा विभाग पूर्वी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा (GIPR) भाग होता आणि १९५१ मध्ये तो मध्य रेल्वे झोनचा भाग बनला.

रेल्वे विद्युतीकरणाचा वेग, जो पर्यावरणास अनुकूल आहे आणि प्रदूषण कमी करतो, २०१४ पासून ९ पट वेगाने वाढला आहे. रेल्वेने ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण नियोजन केले आहे ज्यामुळे डिझेल ट्रॅक्शन काढून टाकणे सुलभ होईल परिणामी कार्बन फूटप्रिंट आणि पर्यावरणीय प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे.

Back to top button