बिहार : दोन गटांत तुफान हाणामारी; ‍व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्यालाच लागली बंदुकीची गोळी (Video) | पुढारी

बिहार : दोन गटांत तुफान हाणामारी; ‍व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्यालाच लागली बंदुकीची गोळी (Video)

भागलपूर ( बिहार) ; पुढारी ऑनलाईन : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात होळीच्या पार्श्वभूमीवर दोन गटांतील हाणामारीत झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली असून घटनेच्यावेळी एक तरुण घराच्या छतावरून दोन गटांतील हाणामारीचा व्हिडिओ बनवत होता. पण त्यालाच गोळी लागली. त्याला रुग्णालयात नेत असताना वाटतेच त्याचा मृत्यू झाला. या तरूणाचे नाव आशिष राज असे आहे. हा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एका वृत्तानुसार, ही घटना भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया येथील राजेंद्र कॉलनीत घडली आहे. याठिकाणी काही नागरिक होळी मोठ्या उत्साहात साजरी करत होते. दरम्यान, नवगछिया नगरपरिषदेचे सभापती प्रेम सागर उर्फ ​​डब्ल्यू यादव यांना याबाद्दलची माहिती मिळताच ते शस्त्रासह गुडांना घेवून तेथे आले आणि तिथल्या नागरिकांशी हुज्जत घालू लागले. यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यत पोहोचले.

दरम्यान, वॉर्डचे नगरसेवक मनीष कुमार सिंह हेही या वादात पडले आणि हा वाद वाढतच गेला. यादव आणि मनीष सिंह यांच्यात एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह मारामारीचा प्रकार घडला. यानंतर दोन्ही बाजूंकडून सुमारे २० राऊंडच्या बंदुकीच्या गोळ्या हवेत झाडण्यात आल्या. या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर जोरदार व्हायरल होत आहे.

यावेळी घराच्या छतावर आशिष राज हा तरूण दोघांच्या भांडणाचा व्हिडिओ शूट करत होता. यातील एक गोळी आशिषला लागली आणि तो कोसळला. यानंतर आशिषला ताबोडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा : 

Back to top button