नाना पटोलेविरोधी गट पुन्हा सक्रीय; हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत दाखल | पुढारी

नाना पटोलेविरोधी गट पुन्हा सक्रीय; हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत दाखल

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील शीतयुद्ध संपण्याची चिन्हे नाहीत. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. आता पटोलेविरोधक पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. पटोले यांच्याविरोधात असलेले प्रदेश काँग्रेसचे २२ पदाधिकारी पुन्हा एकदा हायकमांडची भेट घेत गाऱ्हाणी मांडण्यासाठी दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत.

यात काँग्रेसचे दोन माजी खासदार, माजी राज्यमंत्री, चार माजी आमदार आणि काही जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. मराठवाड्यातील पटोले यांच्याविरोधातील असंतुष्ट गट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेते के. सी. वेणूगोपाल यांची दिल्ली दरबारी भेट घेणार आहेत. प्रदेशाध्यक्षपदावरून पटोले यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी या गटाकडून केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील अनेक नेते पटोले यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. काँग्रेसचे निलंबित नेते व अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात घमासान बघायला मिळाले. निलंबन करवाईनंतरही तांबे अपक्ष म्हणून निवडून आले. मात्र, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात असा संघर्ष अधिकच वाढला. मध्यंतरी थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने थोरात यांची समजूत काढल्यावर हा संघर्ष तेवढ्यापुरता शमला.

आता पुन्हा पटोलेविरोधी गट सक्रीय झाला. एक गट आजवर आदिवासी समाजातून प्रदेशाध्यक्ष न झाल्याचा युक्तिवाद करीत माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची बाजू दिल्लीत लावून धरीत आहे. यात प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, सचिव आर. एम. खान नायडू यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पटोले यांच्या कार्यकाळात विविध समाजघटक उपेक्षित असून त्याचा फटका पक्षाला भविष्यात आगामी निवडणुकीत बसू शकतो, असे ही मंडळी पटवून देत आहेत. यापूर्वी पक्ष निरीक्षक रमेश चेंनिथला यांनाही हा असंतुष्ट गट मुंबईत भेटला होता.

हेही वाचा 

Back to top button