पराभवाच्या भीतीनेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लांबणीवर : नाना पटोले यांचा भाजपवर आरोप | पुढारी

पराभवाच्या भीतीनेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लांबणीवर : नाना पटोले यांचा भाजपवर आरोप

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभवाची भीती वाटते म्हणूनच त्या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. निवडणूक आयोगही याविषयीचा निर्णय घेत नाही. सातत्याने चालढकल सुरू आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. दिल्लीत हायकमांडला भेटून मुंबई मार्गे नागपूरला आलेले नाना पटोले यांचे आज रात्री नागपूर विमानतळावर उत्साहात स्वागत करण्यात आले.

छत्तीसगडमधील अधिवेशनाच्या निमित्ताने नाना पटोले यांची उचल बांगडी होणार अशा चर्चा जोरात होत्या. पटोले विरोधक सक्रिय झाले होते. मात्र कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पटोले यांचे पक्षातील स्थान मजबूत झाल्याचे मानले जात आहे. आपल्या मर्जीतील निवडणूक आयुक्त बसवून आपल्या सोयीचे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच चपराक दिली आहे. भाजपने याकडे दुर्लक्ष करू नये हे लोकशाहीला निश्चितच मारक आहे. मांजर डोळे बंद करून दूध पिते अशी अवस्था सध्या भाजप नेतृत्वाची झाली आहे. भाजपमध्ये गेले आणि पवित्र झाले असे अनेक नेते आहेत याविषयीचा पुनरुच्चार या निमित्ताने त्यांनी केला.

जातीनिहाय जनगणना संदर्भात काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव करण्यात आला. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने त्यांनी आता सुरू असलेल्या जनगणनेत जातीनिहाय जनगणना करावी असे आव्हान त्यांनी या निमित्ताने दिले. हायकमांडशी भेटून नागपुरात होळी खेळण्यासाठी आलो. या शब्दात त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. कसबा निवडणुकीत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची टिंगल भाजप करीत आहे. मुळात काँग्रेस हा जनतेचा तर भाजप हा मूठभर उद्योगपतींचा पक्ष आहे. एक लाख कोटींचा कोळसा फुकटात केंद्र सरकारने उद्योगपती अदानींना दिला दुसरीकडे शेतमालाला भाव नाही कापूस, सोयाबीन,धान उत्पादकांच्या प्रश्नावर सरकारला लक्ष देण्यास वेळ नाही. यामुळे जनताच भविष्यात त्यांना याविषयीचे उत्तर देणार आहे. नागपूर आणि अमरावतीच्या निकालांनी सुशिक्षित मतदारांनी भाजप विरोधात कौल दिला तर सर्वसामान्य जनतेने कसब्यात जनतेचे महत्त्वाचे प्रश्न बेदखल करणाऱ्या भाजपला धडा शिकवला. विदर्भात असलेल्या 62 जागांपैकी अधिकाधिक जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास व्यक्त करतानाच स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने ज्या पक्षाचे काम चांगले त्यांना त्या ठिकाणी झुकते माप दिले जाईल असे स्पष्ट संकेतही त्यांनी महाविकास आघाडी या निवडणुका एकत्रितपणे लढणार का, या प्रश्नाच्या उत्तरात दिले.

Back to top button