गडचिरोली: नाना पटोले यांच्या भावासह ५ जणांवर गुन्हे दाखल | पुढारी

गडचिरोली: नाना पटोले यांच्या भावासह ५ जणांवर गुन्हे दाखल

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: चातगाव येथील डॉ.साळवे नर्सिंग कॉलेजचे संचालक डॉ. प्रमोद साळवे यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ करुन धमकावल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे भाऊ विनोद पटोले यांच्यासह ५ जणांवर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धानोरा तालुक्यातील चातगावनजीकच्या कटेझरी येथे डॉ. प्रमोद साळवे यांची बहीण अल्का रामने यांच्या मालकीची राईस मिल आहे. २०२० मध्ये या राईस मिलच्या विक्रीचा तोंडी सौदा विनोद पटोले यांच्याशी झाला होता. विक्रीपोटी पटोले यांनी डॉ. साळवे यांना ५१ लाख रुपये द्यावयाचे होते. परंतु पटोले यांनी २०२१ पर्यंत केवळ २० लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम देण्याविषयी त्यांनी कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही. त्यामुळे डॉ. साळवे यांनी विनोद पटोले यांना नोटीस पाठवून राईस मिल विक्रीची जाहिरात दिली.

३ मार्च २०२३ रोजी डॉ.साळवे हे आपल्या वाहनाने चातगाव येथून गडचिरोलीकडे येत असताना बोदली गावाजवळ विनोद पटोले आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी आपले वाहन अडवून शिवीगाळ करीत धमकावले. त्यांच्यासोबतच्या अन्य चार जणांनीही धमकावले, अशी तक्रार डॉ. प्रमोद साळवे यांनी पोलिसांत केली होती. त्यानुसार पोलिसांनी विनोद पटोले, सुमित कोठारी, छगन शेडमाके, दामदेव मंडलवार व अन्य एकावर गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा 

गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून ३ वाहनांची जाळपोळ; परिसरात भीतीचे वातावरण

गोंडवाना विद्यापीठ : गडचिरोली केंद्राच्या बांधकाम मंजूरीसाठी मुनगंटीवार यांचे साकडे

गडचिरोली: आरमोरी-देसाईगंज मार्गावर ४ बछड्यांसह वाघिणीचे दर्शन

Back to top button