पाचवड गाव कार्बन न्यूट्रल करण्याचा ठराव | पुढारी

पाचवड गाव कार्बन न्यूट्रल करण्याचा ठराव

भुईंज; पुढारी वृत्तसेवा :  समता दिनानिमित्त पाचवड गावची डुबळा डोंगर पायथ्याला विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कार्बन न्यूट्रल पाचवड गाव असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यासाठी ‘नवलाई देवराई’ प्रकल्पही साकारला जात आहे. दरम्यान, अशा पद्धतीचा ठराव करणारे पाचवड हे देशातील तिसरे गाव असल्याचा दावा ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड हे गाव झपाट्याने विकसित होवू लागले आहे. विविध योजना राबवण्यातही हे गाव अग्रेसर राहिले असून, कार्बन न्युट्रल पाचवड हा त्याचाच एक भाग आहे. जागतिक तापमानवाढ व त्यामुळे होणारे हवामान बदल हे प्रलयकारी संकट टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने जागतिक पातळींवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या विषयावर सर्वत्र जनजागृतीही केली जात आहे. या शतकाअखेर तापमानवाढ जास्तीतजास्त 1.5 सेंटिग्रेडच्या आत रोखण्याचे जागतिक उद्दिष्ट आहे. यासाठी जगातील सर्व देशांकडून 2050 पर्यंत कार्बन न्यूट्रल अथवा नेट झीरो कार्बन उत्सर्जन व्हावे असा व्यापक प्रयत्न आहे. या अनुषंगाने अनेक देशांनी कार्बन न्यूट्रलची उद्दिष्ट ठरवली आहेत. अशा या वैश्विक पवित्र कामात खारीचा वाटा म्हणून पाचवड गाव सामील होत आहे. यासाठी पाचवडची ग्रामदैवत नवलाई देवीच्या नावाने ‘नवलाई देवराई’ ची संकल्पना अंमलात आणली जात आहे. त्याची सुरुवात 5 वटवृक्ष व 5 तुळशीची रोपे लावून करण्यात आली. कार्बन न्यूट्रल होण्यासाठी आवश्यक तेवढी झाडे लावून जगवण्याचा संकल्प ग्रामस्थांनी एकमताने केल्याची माहिती सरपंच सौ. अर्चना नितीन विसापुरे यांनी दिली.

यासंदर्भात झालेल्या ग्रामसभेमध्ये सुमारे 250 ते 300 नागरिक सहभागी झाले होते. आठवड्यातून एक तास यासाठी नागरिकांनी द्यावा, असेही यावेळी एकमताने ठरले. यावेळी प्रत्यक्ष वृक्ष लागवड व संगोपन करण्यासाठी नवलाई वृक्षसंवर्धन समितीची स्थापना करण्यात आली. दरम्यान, ग्रामपंचायत, स्वच्छ वसुंधरा अभियान पुणे, आधार ज्येष्ठ नागरिक संघ, नवलाई पतसंस्था, विकास सेवा सोसायटी, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, आपुलकी मतिमंद मुलांची शाळा आदी विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी बी. के. चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक युवा नेते अजित शेवाळे, स्वागत उपसरपंच कमलाकर गायकवाड यांनी केले. अनिल गायकवाड, रामचंद्र गायकवाड, आनंदराव गायकवाड, रमेश पारखे, लक्ष्मण जाधव, सुषमा पवार यांनी मार्गदर्शन केले. आभार सरपंच अर्चना विसापुरे यांनी मानले. या उपक्रमाची सुरुवात म्हणून मानकर्‍यांनी पालखीतून काढलेली नवलाई देवीच्या पादुकांची मिरवणूक खास आकर्षण ठरली. दरम्यान, कार्बन न्युट्रल गाव ही संकल्पना साकारल्यानंतर पर्यावरणाचा जागर होणार असून, तालुक्यात अनोखा संदेश पोहोचणार आहे.

Back to top button