

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : वाहतूक पोलिसांनी चौकाचौकात वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला असल्याने नसती दंडाची भानगड नको या भीतीने वाहनचालक गल्लीबोळातून 'यु टर्न' घेताना दिसत आहेत. उपराजधानीतील प्रमुख चौकांमध्ये पोलीस कर्मचारी वाहचालकांना थांबवून कागदपत्रांची चाचपणी करीत आहेत. कामाला जाण्याच्या आणि घरी परतण्याचे वेळीच ही तपासणी केली जात असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मार्च एन्डिंगचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ही कारवाई असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांमधून कानी पडते. डोक्यावर हेल्मेट नसलेले किंवा सोबत कागदपत्रे नसलेल्या मंडळींनी गल्लीबोळातून वाहन दामटण्याची शक्कल शोधून काढली आहे. पण, यामुळे अंतर्गत मार्गांवरील वाहनांची गर्दी अचानक वाढली आहे. यावेळी लहान मुले बाहेर खेळत असणाऱ्यांची चिंता वाढली आहे.
शहरातील वर्धा रोड, मनीषनगर, हिंगणा टी पॉईंट, प्रतापनगर, इंदोरा, पाचपावली, जरीपटका, टेका नाका, धरमपेठ, सीताबर्डी, लकडगंज, मानेवाडा, उदयनगर परिसर,इतवारी गंगाजमुना, गोळीबार चौक, बडकस-महाल चौक, सोनेगाव चौक, वाडी नाका, धंतोली, सक्करदरा आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू असल्याचे दिसते. 'मार्च एन्ड'चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलीस धावपळ करीत आहेत. वर्षभर आपकमाई आणि वसुलीवर भर देणारे वाहतूक पोलिस आता मात्र, चोखपणे चालान कारवाई करीत असल्याचे चित्र आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत 'चालान डिवाईस' घेऊन दंडात्मक कारवाईचा सपाटा सुरू आहे.
दरम्यान,पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच सर्वसामान्य वाहनचालकही सतर्कता बाळगून आहेत. बहुतेकांनी हेल्मेट, कागदपत्रे सोबत बाळगणे सुरू केले आहे. पण, वाहनाची कागदपत्रेच नसणारे अनेक वाहनचालक वाहतूक पोलिस दिसताच 'यू टर्न' घेऊन वाहन पळवत असल्याचे अनेकदा चित्र दिसत आहे. यात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.
हेही वाचा