नागपूर : खासगीकरण, जुनी पेन्शन, वाढविणार सरकारचे टेन्शन! | पुढारी

नागपूर : खासगीकरण, जुनी पेन्शन, वाढविणार सरकारचे टेन्शन!

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : “खासगीकरणामुळे देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून आयुध निर्माणीचे खासगीकरण करण्यात येत आहे. भविष्यात या कंपन्या तोट्यात दाखवून त्या उद्योजकांना विकल्या जातील. याविरोधात संसदेला घेराव घालण्यात येईल. तसेच जुनी पेन्शन लागू करणाऱ्या पक्षाला मदत करण्यात येईल,” असा इशारा इंडियन ऑर्डनन्स एम्प्लॉईज युनियनचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉ. सी. शिवकुमार यांनी दिला आहे.

नुकत्याच झालेल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत जुनी पेन्शन मुद्दा सत्तारूढ भाजपला अडचणीचा ठरला. आता राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारची देखील यावरून डोकेदुखी वाढणार आहे. सुमारे 15 कोटी कर्मचारी, कुटुंबीय, नातेवाईक विरोधात मतदान करतील, असा इशारा देण्यात आला आहे. ऑर्डनन्स एम्प्लॉईज युनियन अंबाझरीच्यावतीने देशव्यापी घरोघरी साक्षरता मोहिमेला अमरावती रोडवरील डिफेन्स येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरुवात करण्यात आली. यावेळी सी. शिवकुमार, कामगार नेते बी.बी. मुजुमदार, आशिष पाचघरे, अंबाझरी युनिट महासचिव विनोद कुमार, अनंत भारसाकडे, अबनिष मिश्रा उपस्थित होते. यावेळी छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. जो पक्ष आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जुनी पेन्शन योजना आणि खासगीकरणाचा फेरविचार करण्याचा समावेश करेल, त्याच पक्षाला देशातील सुमारे १५ कोटी कर्मचारी, कामगार कुटुंबे, मतदान करतील असा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. यामुळे सार्वत्रिक निवडणुकीत मोदी सरकारसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

या संदर्भात देशातील २ लाख कर्मचारी आणि महिलांच्या स्वाक्षऱ्या संकलित करून या समस्यांवर सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी राष्ट्रपतींकडे पाठविले जाणार असल्याचे सी. शिवकुमार यांनी सांगितले. इंडियन ऑर्डनन्स एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी यासाठी कामाला लागले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button