यवतमाळ : बारावीच्या इंग्रजीचा पेपर व्हायरल; केंद्र प्रमुखांसह तिघांविरुद्ध गुन्हे | पुढारी

यवतमाळ : बारावीच्या इंग्रजीचा पेपर व्हायरल; केंद्र प्रमुखांसह तिघांविरुद्ध गुन्हे

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा – प्रशासनाने कडक नियोजन करूनही बारावीची परीक्षा सुरू होताच अवघ्या १५ मिनिटात इंग्रजीची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली. यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मुकुटबन परीक्षा केंद्रावर मंगळवारी हा प्रकार घडला. संपूर्ण चौकशीनंतर मंगळवारी सायंकाळी गटशिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीवरून मुकूटबन पोलिसांनी केंद्रप्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मुकुटबन येथील मातोश्री पुणकाबाई कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावरून मंगळवारी बारावीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका अवघ्या १५ मिनिटांतच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाली. या प्रकरणी झरी पंचायत समितीतील एकीकडे १० वी १२ वीची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. यासाठी नियोजनही करण्यात आले आहे. असे असताना मुकूटबन येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावरून मंगळवारी इंग्रजीचा पहिला पेपर व्हॉट्सॲपवरून व्हायरल झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. मुकूटबन येथील मातोश्री पुणकाबाई कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर सकाळी ११ वाजता इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षार्थ्यांना वितरित करण्यात आली. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांतच या प्रश्नपत्रिकेचे फोटो व्हॉट्सॲपवरून व्हायरल झाले.

ही बाब काही जागरूक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित परीक्षा केंद्रावर जाऊन याबाबत चौकशी केली. काहींनी लगेच पांढरकवडा येथील साहाय्यक जिल्हाधिकारी याशनी नागराजन, झरीचे तहसीलदार गिरीश जोशी, गटशिक्षणाधिकारी मो. याकूब मो. अमीर हमजा यांना माहिती दिली. माहिती मिळताच, अधिकाऱ्यांचा ताफा या परीक्षा केंद्रावर दाखल झाला. ठाणेदार अजित जाधव हे देखील आपल्या पथकासह परीक्षा केंद्रावर पोहोचले. या परीक्षा केंद्रावर एकूण २१५ विद्यार्थ्यांपैकी २११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या केंद्रातील खोली क्रमांक ८ मधून प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी या खोलीवर फोकस करून तपासणी केली.

या खोलीवर पर्यवेक्षक म्हणून प्रेमेंदर नरसारेड्डी येलमावार कार्यरत होते. तर केंद्रप्रमुख म्हणून अनिल विठ्ठल दुर्लावार हे काम पाहत होते. पोलिस अधिकाऱ्यांनी संशयित विद्यार्थ्यांची चौकशी करून त्यापैकी एका विद्यार्थिनीचे जबाब नोंदविला. चौकशीअंती गटशिक्षणाधिकारी मो. याकूब मो. अमीर हमजा यांच्या तक्रारीवरून मुकूटबन पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी केंद्रप्रमुख अनिल दुर्लावार, पर्यवेक्षक प्रेमेंदर येलमावार व एका अज्ञात इसमाविरुद्ध भादंवि १८८, महाराष्ट्र विद्यापीठाच्या व परीक्षा मंडळाच्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम कलम ५ अन्वये गुन्हा दाखल केला.

Back to top button