Washim Crime: बोराळा येथे अपहरण करुन उपसरपंचाचा खून: ४ भावांना अटक | पुढारी

Washim Crime: बोराळा येथे अपहरण करुन उपसरपंचाचा खून: ४ भावांना अटक

वाशिम: पुढारी वृत्तसेवा: राजकीय पूर्ववैमनस्यातून मालेगाव तालुक्यातील बोराळा येथील उपसरपंचाचे अपहरण करून खून केल्याची घटना शनिवारी (दि.१८) (Washim Crime) घडली. विश्वास श्रीपत कांबळे (वय ६०) असे मृत उपसरपंचाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी केशव वानखेडे, रामचंद्र वानखेडे, शामसुंदर वानखेडे व नामदेव वानखेडे या ४ भावांना अटक केली आहे. तर यात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराळा येथील उपसरपंच विश्वास कांबळे हे पत्नी लिलाबाई यांच्यासोबत शनिवारी किन्हीराजा येथे बाजारासाठी आले होते. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना (एमएच ४७ एन ०४३९) या क्रमांकाच्या कारमध्ये बळजबरी बसवून अपहरण (Washim Crime) केले. यानंतर जीवे मारण्याच्या हेतूने मारहाण करुन गुंज फाट्यावर फेकून दिले. याची माहिती मिळताच कुटुंबियांनी व पोलिसांनी त्यांना उपचारासाठी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी मृत उपसरपंचाची पत्नी लिलाबाई यांनी जऊळका पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंगरुळपीर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button