यवतमाळ: एकाच मांडवातील दोन बालविवाह रोखले | पुढारी

यवतमाळ: एकाच मांडवातील दोन बालविवाह रोखले

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा: यवतमाळ शहरात एकाच मांडवात दोन अल्पवयीन मुलींचा विवाह लावण्यात येत होता. त्यात एक मुलगी केवळ साडेचौदा वर्षांची, तर दुसरी मुलगी केवळ १६ वर्षांची होती. ऐनवेळी प्रशासनाच्या पथकाने पोहोचून हे दोन्ही विवाह उधळून लावले.

यवतमाळ शहरातील एका वस्तीत बालविवाह होणार आहेत, अशी गोपनीय माहिती प्रशासनाला त्रयस्थ व्यक्तीकडून मिळाली. त्याची तातडीने दखल घेत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात एक पथक तयार करण्यात आले. त्यांनी तातडीने मंडपी भेट दिली.

यावेळी दोन्ही कुटुंबांतील पालकांना मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह न लावण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. अल्पवयात लग्न लावून दिल्यास व त्यास सहकार्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना १ लाख रुपये दंड व २ वर्षे कारावास होऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली. मुलीची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, असे लेखी हमीपत्र पालकांकडून घेण्यात आले. मुलींना पालकांसमवेत बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात आले. पालकांनी लेखी हमीपत्र समितीस सादर केले. सदर कारवाई जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आकाश बुर्रेवार, कोमल नंदटेल, चाइल्ड लाइनचे फाल्गुन पालकर, गणेश आत्राम व पूजा शेलारे तसेच शहर पोलीस ठाण्याचे बीट जमादार रामदास काळे यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button