Amravati Postal Division : अमरावती टपाल विभाग राज्यात प्रथम आणि देशात चौथा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : भारतीय डाक विभागामार्फत आयोजित देशव्यापी विशेष सुकन्या अभियानांतर्गत अमरावती (Amravati Postal Division )) डाक विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.. तिवसा तालुक्यातील ‘मोझरी’ हे गाव ‘संपूर्ण सुकन्या ग्राम’ घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच या गावातील सर्व मुलींचे सुकन्या खाते उघडण्यात आलेले आहेत. हे अभियान ९ व १० फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतभर डाक विभागामार्फत राबविण्यात आले होते. या दरम्यान अमरावती डाक विभागाने तब्बल ७ हजार ८२७ सुकन्या समृध्दी खाते उघडली. अमरावती डाक विभागाने राज्यासह देश पातळीवरही उत्कृष्ट कामगिरी केली. अमरावती जिल्हाचा देशपातळीवर चौथा क्रमांक आला.
Amravati Postal Division :“अमरावती जिल्हा, संपूर्ण सुकन्या जिल्हा”
या अभियानासाठी अमरावती विभागाव्दारे हाती घेतलेली “अमरावती जिल्हा, संपूर्ण सुकन्या जिल्हा” ही मोहिम उपयुक्त ठरली. ही मोहिम जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा आवाहनाच्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी प्रवर अधीक्षक डाकघर डॉ. वसुंधरा गुल्हाणे यांच्या हस्ते प्रधान डाकघर येथून प्रक्षेपित करण्यात आली.
पोस्ट विभागामार्फत हा उपक्रम अमरावती जिल्ह्यात ८ मार्च २०२३ (जागतिक महिला दिन) पर्यंत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील ० ते १० वयोगटातील मुलींचे सुकन्या समृध्दीचे खाते उघडण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अभियाना दरम्यान मिळालेल्या यशाने, संपूर्ण जिल्हा सुकन्या जिल्हा करण्याच्या अमरावती विभागाचे ध्येय आहे . येत्या जागतिक महिला दिनापर्यंत ‘मोझरी’ प्रमाणेच जिल्ह्यातील प्रत्येक गाव व शहर हे ‘संपूर्ण सुकन्या ग्राम’ आणि ‘संपूर्ण सुकन्या शहर’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील नागरिक तसेच अंगणवाडी सेविकांनी सहाय्य करण्याचे आवाहन प्रवर श्रीमती गुल्हाणे यांनी केले आहे.
या मोहिमेत आपल्या मुलीचे खाते काढण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा आपल्या पोस्टमन सोबत संपर्क साधावा. असे आवाहन अमरावती डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.
हेही वाचा
- अमरावती: नांदगावचे ८५० वर्ष पुरातन श्री खंडेश्वराचे देवालय
- अमरावती : जिल्ह्यातील २८ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखली
- अमरावती : अमृता राऊत यांना पीएचडीमध्ये गोल्ड मेडल
- दिल्लीसह महाराष्ट्र, हरियाणा, यूपीचे ‘ईव्ही’ धोरण सर्वाधिक व्यापक; ‘क्लायमेट ट्रेंड’चा निष्कर्ष