तांदूळ निर्यातीत नागपूरची आगेकूच; जानेवारीत ६ हजार कंटेनर रवाना | पुढारी

तांदूळ निर्यातीत नागपूरची आगेकूच; जानेवारीत ६ हजार कंटेनर रवाना

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : देशाचे ह्रदयस्थान, भौगोलिक दृष्ट्या देशाच्या मध्यभागी असलेले नागपूर आता दळणवळणाच्या सर्वोत्तम सुविधांसह ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून पुढे येत आहे. जानेवारीमध्ये ६ हजार कंटेनर्स नागपुरातून तांदूळ निर्यातीसाठी रवाना झाले आहेत.  मेट्रो, मिहान आणि इतर विविध विकास प्रकल्पांसह नागपूर शहर आता आयात-निर्यातीतही पुढे जात आहे. येथून तांदूळ, कापूस, ट्रॅक्टर तसेच इतर अनेक प्रकारचा माल विदेशात पाठविला जाऊ लागला आहे. पूर्व विदर्भ धान उत्पादक पट्टा असून विदर्भाचा तांदूळ रशिया, इराणसह आफ्रिकन देशात पसंत केला जातो. त्यामुळेच विदर्भात उत्पादित होणाऱ्या तांदळाची मागणी या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

एक ते दीड वर्षापूर्वी जी निर्यात ३५ ते ४० टक्के होती. ती आता ६० टक्के झाली आहे. त्याचप्रमाणे आयातही ४० टक्क्यांनी वाढली आहे. वाढत्या निर्यात आणि आयातीमुळे, खापरी येथील मिहानस्थित कॉनकॉरच्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कचे महत्त्व वाढले आहे. दिवसेंदिवस याची व्याप्ती वाढत आहे. सन २०२२ मध्ये म्हणजेच, १० महिन्यांत येथून ७ लाख मेट्रिक टन तांदूळ निर्यात करण्यात आला.

मिहानमधून अंतर्गत व्यवसायासोबत देशांतर्गत व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे ट्रॅक्टर, पेपर्ससह फूड्स मोठ्या प्रमाणात बाहेर जात आहे. जानेवारी २०२३ मध्ये निर्यात आणि आयात दोन्हीमध्ये मोठी उडी घेतली होती. दर महिन्याला ५ हजार कंटेनर माल पाठविला जातो आहे. त्यातील ३ हजार कंटेनर फक्त तांदळाचे असतात. यामध्ये जानेवारी २०२३ मध्ये कंटेनरची संख्या वाढून ६ हजार झाली, त्यापैकी ३,३३० तांदळाचे होते. अन्य वस्तू उर्वरित कंटेनरमध्ये गेल्या आहेत.

गेल्या वर्षी दहा महिन्यांत एकूण ७ लाख मेट्रिक टन तांदूळ निर्यात केला गेला. केवळ जानेवारी २०२३ मध्येच येथून एकूण १,२०,००० मेट्रिक टन माल पाठविण्यात आला. त्यापैकी ९० हजार मेट्रिक टन तांदूळ होता. तांदळाचा प्रमुख पुरवठा भंडारा, गोंदिया आणि छत्तीसगडमधील रायपूर येथून होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button