चंद्रपूर : पोतरा नदीपात्रात वाघ मृतावस्थेत आढळला | पुढारी

चंद्रपूर : पोतरा नदीपात्रात वाघ मृतावस्थेत आढळला

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा चंद्रपूर – वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पोतरा नदीपात्रात एक नर जातीचा वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना काल (शनिवार) दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. वनाधिकाऱ्यांनी मौका पंचनामा करून मृत वाघाचे चंद्रपुरातील टीटीसी केंद्रात शवविच्छेद केले आहे. मात्र वाघाचा मृत्यू संशयास्पद असल्याच्या चर्चा सुरू असल्यामुळे वनविभागाने त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

या विषयी मिळालेली आधिक माहिती अशी की, चंद्रपूर (वरोरा) – वर्धा (हिंगणघाट) सीमेवरील पोतरा नदीपात्रात काल (शनिवार) सायंकाळच्या सुमारास नर जातीचा वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती वरोरा व हिंगणघाट येथील वनविभागाला मिळाली. ज्या ठिकाणी वाघ मृतावस्थेत आढळला ती जागा वनपरिक्षेत्र हिंगणघाटच्या अखत्यारीत आहे की वरोऱ्याच्या, असा संभ्रम बराच वेळ निर्माण झाल्याने वनाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचणे बराच उशीर झाला. या विषयावर बराच खल झाल्यानंतर घटनास्थळ वरोरा वनपरिक्षेत्रात असल्याचे निश्चित झाल्यानंतर वर्धा व वरोरा वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचले आणि संयुक्त पंचनामा केला.

घटनास्थळ मुख्य मार्गावरून आत असल्याने वाघाला तिथून काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. शेवटी, रात्री उशिरा शवविच्छेदनाकरिता मृत वाघ टीटीसी, चंद्रपूरला रवाना करण्यात आले. वाघ नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आल्याने सदर प्रकरणाविषयी वेगवेगळ्या चर्चां ऐकायला मिळत आहेत. काहींच्या मते ‘ करंट ‘ लागल्याने वाघ थोडे अंतर चालून नदीपात्रात पडला व तिथेच मरण पावला, तर अन्य व्यक्तींच्या मते वाघ अज्ञात स्थळी मेला व नंतर त्याला नदीपात्रात फेकण्यात आले अशी ही चर्चा ऐकायला मिळत आहे.

शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच वाघाच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याची शक्यता आहे. पुढील तपास सहायक वनसंरक्षक (तेंदू) निखिता चौरे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, वनरक्षक नेवारे, केजकर करीत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button