मोठी बातमी: कोश्यारींचा राजीनामा स्वीकारला, महाराष्ट्राला मिळाले नवीन राज्यपाल | पुढारी

मोठी बातमी: कोश्यारींचा राजीनामा स्वीकारला, महाराष्ट्राला मिळाले नवीन राज्यपाल

पुढारी ऑनलाईन: भारताच्या राष्ट्रपतींनी भगतसिंग कोश्यारी यांचा महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा स्वीकारला आहे. यानंतर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली, असल्याची घोषणा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू  यांच्याकडून करण्यात आली आहे. ‘रमेश बैस’ हे यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते. भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लडाखचे नायब राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. यासोबतच काही राज्यांमध्ये नवीन राज्यपालांचाही नियुक्त्या राष्ट्रपतींडून करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे त्यांच्या वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरले होते. त्यानंतर त्यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी सुरू होती. दरम्यान कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला होता. तो राष्ट्रपतींनी नुकताच मंजूर करत राज्याच्या नवीन राज्यपालांची घोषणा केली आहे.

कोण आहेत रमेश बैस…

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले रमेश बैस हे मूळचे छत्तीसगडचे आहेत. 1947 साली जन्मलेले बैस यांनी तत्कालीन वाजपेयी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले होते. तब्बल सात वेळा ते खासदार राहिलेले आहेत. छत्तीसगडचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले होते. आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता अशी त्यांची ओळख आहे. बैस यांनी छत्तीसगडमधील रायपूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व केले होते.

रायपूरमध्ये बैस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. 1978 साली रायपूर महानगरपालिकेत ते निवडून आले. 1980 ते 1984 या काळात ते मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. 1989 साली सर्वप्रथम रायपूर मतदारसंघातून खासदार बनले. त्यानंतर सलग सातदा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. लालकृष्ण अडवाणी यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. सलग सातदा विजय मिळवूनही 2019 साली बैस यांचे तिकीट कापण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणूक पार पडल्यावर लगेचच त्यांची नियुक्ती त्रिपुराचे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. यानंतर त्यांच्याकडे झारखंडची जबाबदारी देण्यात आली होती.

‘या’ नवीन राज्यपालांची नियुक्ती

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, सिक्कीमचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडचे राज्यपाल म्हणून सीपी राधाकृष्णन, आसामचे राज्यपाल म्हणून गुलाबचंद कटारिया तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Back to top button