काँग्रेसचे विधान परिषदेतील यश भाजपला खुपतंय : नाना पटोले | पुढारी

काँग्रेसचे विधान परिषदेतील यश भाजपला खुपतंय : नाना पटोले

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : आम्हाला जे घवघवीत यश नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मिळाले. त्यामुळे भाजपच्या पोटात दुखत आहे. ते म्हणतात, आमच्या नाकाखालून सरकार पाडलं. आम्ही त्यांच्या नाकातील बाल काढला, असा निशाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साधला. नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर ते आज प्रथमतः नागपुरात आले. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार उपस्थित होते. या यशाचे श्रेय त्यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीला दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. याबाबत विचारले असता, नाना पटोले म्हणाले, सर्वप्रथम बाळासाहेबांना आज त्यांच्या वाढदिवसाबद्दल मी शुभेच्छा देतो.

बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात असले तरी प्रदेशकडे तो आलेला नाही. पक्षश्रेष्ठींना पत्र दिले म्हणतात, ते पत्र मला दाखवा, असे सांगत बाळासाहेब माझ्याशी बोलत नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस पक्षातील काही ज्येष्ठ आणि तरुण नेते तुमच्यावर सातत्याने आरोप करीत आहेत. यामुळे तुमची बदनामी होत नाही का, असे विचारले असता ते म्हणाले, ‘जिसका नाम होता है, उसी को बदनाम किया जाता है’ त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. आमच्या पक्षात लोकशाही आहे, व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे आपली मते थेट पक्षश्रेष्ठींकडे मांडण्याची मुभा आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button