चंद्रपूर : “त्या” पट्टेदार वाघाचा मृत्यू विद्युत शॉक मुळेच; शेतकरी वनविभागाच्या ताब्यात | पुढारी

चंद्रपूर : "त्या" पट्टेदार वाघाचा मृत्यू विद्युत शॉक मुळेच; शेतकरी वनविभागाच्या ताब्यात

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : शेतात लागवड केलेल्या पिकाची रानडूकरांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या विद्युत तारांना पट्टेदार वाघाचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत एका २२ वर्षीय युवा शेतकऱ्याला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. अंकूश पुनाजी नायगमकर असे ताब्यात घेण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी (दि.६) सकाळी अकराच्या सुमारास मुल तालुक्यातील नांदगाव शेत शिवारात वाघाच्या मृतदेह आढळला होता.

पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या मुल तालुक्यातील नांदगाव शेत शिवारात अरूण म्हलारी मसारकर यांची चार एकर शेती आहे. संबंधिताने सोयाबीनचे पीक घेतल्यानंतर रब्बीचे पीक म्हणून चार एकरामध्ये चणा पेरलेला होता. रानडुकरामुळे पीकाचे नुकसान होवू नये म्हणून सभोवताल काटेरी तारेचे कम्पाउंड उभारले आहे. या काटेरी तारांमधून रात्रीच्या वेळेस वन्यप्राणी आत जावू नये म्हणून त्याला जिवंत विद्युत तारा प्रवाहित करण्यात आल्या होत्या. शेतातील विद्युत तारा प्रवाहित असताना पट्टीदार वाघाचा त्या तारांना स्पर्श होऊन शॉक लागला. त्यातच वाघाचा मृत्यू झाला.

सोमवारी दुर्गंधी सुटल्यानंतर गावक-यांनी त्या दिशेने धाव घेतल्यानंतर त्यांना वाघ मृतावस्थेत आढळून आला. वनविभागाने घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि वाघाच्या मृत्यूचे कारण शोधले असता धक्कादायक माहिती समोर आली. विद्युत तारामुळेच वाघाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणात २२ वर्षीय शेतकऱ्याला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. सदर शेतकऱ्यांनी विद्युत तारा वन्य प्राण्यांच्या संरक्षणाकरीता लावण्यात आल्याचे आणि त्या वाघाचा तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button