Amit Deshmukh: प्रदेश कमिटीच्या आदेशानंतरही अमित देशमुख यांची गैरहजेरी : चर्चेला पुन्हा उधाण

औरंगाबाद: रवी माताडे: अदानी उद्योग समूहातील गैरकारभाराची चौकशी व्हावी, यासाठी काँग्रेसच्यावतीने सोमवारी (दि.6) राज्यभरात आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रदेशने राज्यातील वरिष्ठ नेत्यांना जिल्हानिहाय जबाबदारीही दिली होती. औरंगाबादेतील आंदोलन माजीमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली होणार होते. मात्र, त्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. मंत्रीपद गेल्यापासून देशमुख यांचा शहर व जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे. त्यातच प्रदेश कमिटीच्या आदेशानंतरही देशमुख यांची गैरहजेरी चर्चेचा विषय बनली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिथे आपले पालकमंत्री नाहीत, त्या जिल्ह्यात काँग्रेसने संपर्क मंत्री नेमले होते, अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना औरंगाबादचे संपर्कमंत्री करण्यात आले होते. वैद्यकिय शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी याकाळात शहर व जिल्ह्याचा दौरा केला. घाटी रुग्णालयाला भेटी देऊन, प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. या दौऱ्यात त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या बैठकाही घेतल्या. अनेकदा स्थानिक नेत्यांना मुंबईत बोलावून जिल्ह्यातील प्रश्न, अडचणींबाबत बैठका होत होत्या. मविआचे सरकार कोसळल्यानंतर त्यांचे मंत्रीपद गेले, आणि त्यासोबतच त्यांचा जिल्ह्याशी असलेला संपर्कही तुटला. दरम्यान देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही आता कार्यकर्त्यांना खरी वाटू लागली आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीने 6 फेब्रुवारी रोजी राज्यभरात एसबीआय आणि एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी जिल्हानिहाय राज्यातील नेत्यांना जबाबदारीही दिली होती. जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या नेत्यांसोबत समन्वय साधून आंदोलनाबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्ह्यातील नेत्यांनी देण्यात आल्या होत्या. औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी अमित देशमुख यांना दिलेली होती. स्थानिक नेत्यांनी देशमुख यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांचा संपर्क देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकापर्यंतच झाला, अमित देशमुख यांच्यापर्यंत ते पोहचू शकले नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे, लातूर शहर व ग्रामीणच्या आंदोलनासाठी प्रदेश कमिटीने आमदार प्रणिती शिंदे यांना जबाबदारी दिली होती.
यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, प्रदेश कमिटीने जिल्हानिहाय नेत्यांची नियुक्ती केली होती. मात्र अनेकांना आपल्या जिल्ह्यात, मतदारसंघात थांबावे वाटले. स्वत:चा मतदारसंघ हा एक विषय असतो. आंदोलन झाले की नाही, हा मूळ विषय आहे. जिल्ह्यातील आंदोलनासाठी नेते नेमले की स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो. अमित देशमुख यांनी लातूरला आंदोलन केले, असे आम्हांला कळले आहे.
हेही वाचा
- अदानी प्रकरणावरून औरंगाबादमध्ये काँग्रेसचे आंदोलन, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
- औरंगाबाद : अवैध गर्भपात प्रकरणी चितेगाव येथील रुग्णालय सील, डॉक्टर फरार
- औरंगाबाद : सायबर भामट्यांकडून पोलिसांनी ११ लाख मिळविले परत