

मोशी : पठारेमळा चर्होली बुद्रुक येथे महावितरण कंपनीचा गलथान कारभार सुरू असून, गेल्या अनेक दिवसांपासून कुठल्याही प्रकारचे रीडिंग घेतले जात नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. पठारेमळा भागात रीडिंग घेतले जात नाही. वेळेवर बिलदेखील मिळत नाही, बिल अव्वाच्यासव्वा मिळत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनदेखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.
परंतु, बिल थकल्यानंतर ताबडतोब वीजतोड करण्याची कारवाई केली जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याची वेळ येऊ देऊ नये, अशी मागणी स्थानिक रहिवाशी अमित पठारे यांनी केली आहे.
पठारे मळा भागात रीडिंग घेतले जात नसल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. रीडिंग घेणारी कंपनी काही महिन्यांत बदलण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल.
– विजय पाटील,
कनिष्ठ अभियंता, महावितरण