

महाड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मौजे दासगाव येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने केमिकलचा टँकर आज (दि.३) दुपारी पलटी झाला. सुदैवाने यात कोणी जखमी झालेला नाही. टँकर पलटी झाल्यानंतर वाहतूक कोंडी झाली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
याबाबत अधिक माहिती अशी, तारापूर औद्योगिक वसाहतीमधून महाड एमआयडीसीतील एका कंपनीत मिक्स रसायन घेऊन हा टँकर (क्र. एमएच ०४ बीजी ८१३) जात होता. यावेळी दासगाव येथे हा टँकर पलटी झाली. याची माहिती महाड औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी कंपनीचे केमिकल एक्सपर्ट शितल पाटील आणि देशमुख हायड्रा सर्व्हिस व लार्सन टूब्रो कंपनीला देण्यात आली. त्यानंतर महाड एमआयडीसी अग्निशमन दल, एमएआरजी टीम व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन आपत्कालीत आवश्यक असलेल्या गोष्टीची पूर्तता केली. टँकर महामार्गावरून बाजूला हलवण्यात आला. त्यानंतर महामार्गाची स्वच्छता करण्यात आली. दरम्यान दोन्ही कडील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी तातडीच्या उपायोजना करत वाहतूक पूर्ववत सुरू केली.
हेही वाचलंत का ?