वाशिम : बॉम्बच्या अफवेने हादरले वाशिम | पुढारी

वाशिम : बॉम्बच्या अफवेने हादरले वाशिम

अजय ढवळे, वाशिम : आज सकाळी वाशिम शहरातील पाटणी चौक येथील एका हार्डवेअर दुकानासमोर बेवारस बॅग आढळून आल्याने आणि त्यामध्ये बॉम्ब आहे, अशा अफवेने शहरात एकच खळबळ उडाली, घटनेची माहिती मिळताच पोलीस दल ,बॉम्ब शोधक पथक,डॉग पथक, अग्निशामक दल,उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे,पोलीस निरीक्षक धुर्वास बावनकर,आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.

या घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक पथकाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि श्वानांच्या सहाय्याने बॅगची तपासणी केली असता त्यामधे काहीच आढळले नाही. त्यानंतर कळाले की, जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह याच्या आदेशाने पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रात्यक्षिक करण्यात आले होते, हे कळताच शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

आज सकाळी वाशिम शहर पोलिसांना माहिती मिळाली की, शहरातील पाटणी चौक येथील एका स्थलांतरित झालेल्या हार्डवेअर दुकानासमोर काळ्या रंगाची बेवारस बॅग ठेवलेली आहे. घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलीस, बॉम्बशोधक पथक, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि बॉम्ब शोधक पथकाच्या साह्याने बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये काहीच मिळून आले नाही.

सदर घटनेविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिह यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आणि दुर्गादेवी उत्सव पाहता, माझ्या सूचनेनुसार, एसडीपीओ केडगे, शहर पोलीस निरीक्षक आणि बॉम्ब शोधक पथक टीमद्वारे आज ‘संभाव्य बॉम्ब असलेली अज्ञात पिशवी’ यासंदर्भात एक मॉक-ड्रिल आयोजित करण्यात आली होता.

मॉक-ड्रिल दरम्यान अधिकारी आणि सर्व पथकांनी मानक-ऑपरेटिंग-प्रक्रियेनुसार प्रतिसाद दिला असल्याने आपण समाधानी आहोत असे दैनिक पुढारीशी बोलतांना सांगितले यामध्ये पोलीस यंत्रणा किती सज्ज आहे हे देखील जनतेला कळले.

Back to top button