यवतमाळ : ६५ वर्षीय वृध्दाचा डोक्यात वरवंटा घालून निर्घुण खून | पुढारी

यवतमाळ : ६५ वर्षीय वृध्दाचा डोक्यात वरवंटा घालून निर्घुण खून

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : शेतात झोपून असलेल्या एका ६५ वर्षीय वृध्दाच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केल्याची घटना घडली. ही घटना राळेगाव तालुक्यातील कळमनेर शेतशिवारात सोमवारी (दि. १५) उघडकीस आली.

अशोक धनंजय अक्कलवार ( रा.शांती नगर, राळेगाव) असे मृत वृध्दाचे नाव आहे. अशोक अक्कलवार या वृध्दाचे कळमनेर शिवारात शेत आहे. नेहमीप्रमाणे ते या शेतातील खोपीत झोपले होते. सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा समीर हा शेतात दूध आणण्याकरिता गेला होता. त्यानंतर मुलगा समीर याला वडील अशोक हे खाटेवर मृतावस्थेत आढळून आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर डोक्यावर दगडी वरवंटाचा मार लागून चेहरा रक्ताने माखला होता. घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहाणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता रूग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी राळेगाव पोलीस ठाण्यात मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील यांच्यासह राळेगाव पोलीस करीत आहे.

हेही वाचा

Back to top button