नागपूर : पतंगांनी व्यापले आकाश; शहरातील १२ उड्डाणपूल बंद, वैद्यकीय व्यवस्था अलर्टवर

नागपूर : पतंगांनी व्यापले आकाश; शहरातील १२ उड्डाणपूल बंद, वैद्यकीय व्यवस्था अलर्टवर
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : रविवारी आलेल्या मकरसंक्रांतीच्या निमित्ताने नागपुरात पतंग शौकीनांच्या आनंदाला उधाण आले आहे. रंगीबेरंगी पतंगांनी आकाश व्यापले असून सर्वत्र ओ.. .पार…ओ काsssट…च्या आरोळ्या घुमत आहेत. आज (दि. १५) सकाळपासूनच आकाशात पतंगांची गर्दी झाली होती. अबालवृद्ध सारेच पतंग उडविण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. उपराजधानीतील प्रत्येक भागात आकाशातील पतंगांच्या गर्दीचे दृष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. प्रत्येक गच्चीवर सकाळपासूनच अख्खे कुटुंब एकत्रित पतंग उडवण्याचा आनंद घेत आहे. महिला, युवती पतंग उडविण्याची हौस भागविताना दिसत आहे. पतंग उडवितानाच डीजेच्या तालावर नृत्याचाही आनंद घेत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. शनिवारी आणि शुक्रवारी शहरातील सर्वच बाजारपेठांमधील पतंग व मांजाच्या दुकानांमध्ये गर्दी झालेली दिसली. जुनी शुक्रवारी येथील बाजारात तर पाय ठेवायलाही जागा नसल्याचे दिसून आले.

नायलॉन मांजाचा सर्रास वापर

प्रतिबंधित नायलॉन मांजाला सर्वच स्तरातून विरोध झाला. शाळकरी मुलांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथही घेतली. प्रशासनानेही आवश्यक खबरदारी घेतल्याचा दावा केला. आज मात्र स्थिती काही वेगळीच दिसली. पोलिसांनी अगदी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. ड्रोनद्वारे लक्ष ठेवणार असल्याचेही सांगितले होते. पण, या साऱ्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. अगदी बिनधास्तपणे शहराच्या सर्वच भागात नायलॉन मांजानेच पतंग उडविला जात असल्याचे चित्र होते. आनंदाच्या या पर्वादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक नागरिक सतर्क होते. मांजा दिसेल तेथे त्याच्या वापरावर विरोध करण्यावर भर दिल्याचेही दिसले.

१२ उड्डाणपूल बंद

नायलॉन मांजाचा सर्वाधिक धोका दुचाकी चालकांना होतो. त्यातही उड्डाणपुलांवर सर्वाधिक भीती असते. ही बाब लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील उड्डाणपूल आज (दि. १५) सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

जखमींना तात्काळ मदत मिळावी यासाठी वैद्यकीय व्यवस्ठा अलर्टवर

दरम्यान, मांजामुळे आतापर्यंत अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ मदत मिळावी यासाठी मेडिकल, मेयोत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आकस्मात विभाग, अस्थिव्यंग आणि सर्जरी विभागाला अलर्ट राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. संबंधित विभागचे प्रमुख व अधिनस्थ डॉक्टरांनाही तत्परतेने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news