

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : दिव्यशक्ती असल्याचा दावा करणारे व बागेश्वर सरकार नावाने ओळखले जाणारे २६ वर्षीय धीरेंद्र कृष्ण महाराज भोंदू व ठग आहेत. त्यांच्यावर तातडीने गुन्हा नोंदवून अटक करावी, अशी मागणी अंनिसचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी काल (दि. १३ ) पत्रकार परिषदेत केली. धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ३० लाख रुपयांचे आव्हान न स्वीकारताच नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरून पळ काढला आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
प्रा. मानव म्हणाले की, आमदार मोहन मते यांच्या पुढाकाराने त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि.13) पर्यंत करण्यात आले होते. बागेश्वर धाम, छत्तरपूर (मध्य प्रदेश) येथील धीरेंद्र महाराज यांनी दिव्य दरबारात विविध दावे केले आहेत. त्यांचे चमत्कारिक दावे जादूटोणा विरोधी कायदा २०१३ आणि ड्रग अँड मॅजिक रेमेडिज ॲक्ट १९५४ या दोन्ही कायद्यानुसार गुन्हा ठरतात. दिव्य दरबारमधील व्हिडिओज व सर्व पुरावे लिखित स्वरूपात ८ जानेवारी रोजी आम्ही सहाय्यक पोलिस आयुक्त रोशन पंडित यांच्याकडे दिले आहेत. तरीही अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.
महाराजांचे नागपूरमध्ये रामकथा प्रवचन होते. यानिमित्त त्यांनी 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार' घेतला. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार १४ जानेवारीपर्यंत महाराज नागपुरात थांबणार होते. पण अंनिसच्या आव्हानानंतर दोन दिवसांपूर्वीच येथून पळ काढला. दुसरीकडे कॅन्सर रुग्णालय संदर्भात महत्वाची बैठक असल्याने महाराज गेल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
महाराजांचा भंडाफोड करण्यासाठी येत्या १९ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता रमण विज्ञान केंद्राजवळील श्री गुरुदेव सेवाश्रम येथे जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहिती प्रा. मानव यांनी दिली. या पत्रकार परिषदेला हरीश देशमुख, छाया सावरकर, सुनील पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते.