Aditya Thackeray : राज्यात ६ महिन्यांपासून मोगलाई सुरू: आदित्य ठाकरे | पुढारी

Aditya Thackeray : राज्यात ६ महिन्यांपासून मोगलाई सुरू: आदित्य ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. सरवणकर यांना वाचविण्याचा प्रयत्न राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारकडून केला जात आहे. वाचाळवीर मंत्र्यांना पाठीशी घातले जात आहे. त्यांच्यावरही कोणतीच कारवाई केलेली नाही, असा आरोप करून मागील सहा महिन्यांपासून राज्यात मोगलाई सुरू आहे, असा हल्लाबोल माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे -फडणवीस सरकारवर आज (दि. १३) पत्रकार परिषदेत केला.

ठाकरे  (Aditya Thackeray) म्हणाले की, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके देत हे सरकार पुढे चालले आहे. मुंबई महापालिकेची लूट खोके सरकारकडून सुरू झाली आहे. मुंबईतील रस्त्यांसाठी ५ हजार कोटींचे टेंडर काढण्यात आले. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून शेवटी हे टेंडर रद्द करण्याची वेळ आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईतील रस्त्यांची कामे कशी केली जातात, हेच माहित नाही. कामाची समज नसताना टेंडर काढून ठेवली आहेत. महापौर, लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकांना टेंडर काढण्याचा अधिकार कुणी दिला ? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

मुंबईतील कुठलंही टेंडर हे इतर राज्यापेक्षा, शहरापेक्षा जास्त असते. ४०० किलोमीटरचे रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास होत आहे. टेंडरचे पैसे नागरिकांच्या खिशातून दिले जाते. सिमेंट काँक्रीटचे रस्ते रद्द करा, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली. मुंबईचा एटीएमसारखा वापर केला जात आहे. मुंबईला विकून नका, असेही ठाकरे म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button