

पुढारी ऑनलाईन : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान अर्ज भरायच्या अखेरच्या क्षणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेतली. पुढे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला. यानंतर राजकीय वर्तुळात हे भाजपचे धक्कातंत्र असल्याच्या चर्चेला उधाण आले. यावर प्रतिक्रिया देताना, आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ. यासंदर्भातील सर्व निर्णय चंद्रकांत बावनकुळे घेतील; अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, सत्यजित तांबे यांचे युवानेता, एक व्यक्ती म्हणून काम चांगले आहे. ऐनवेळी उमेदवार द्यायचा नाही असं आम्ही ठरवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमागे कोणतीही गणिते नसल्याचेही ते म्हणाले. या ठिकाणी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी शेवटपर्यंत आमचे बोलणे सुरू होते. पण काही कारणास्तव हे शक्य न झाल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पंकजा मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, या चर्चेवर मत मांडताना भाजप हे त्यांचे घर आहे. त्यामुळे त्या कधीच मातोश्रीवर जाणार नाहीत, त्या भाजपमध्येच राहतील असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.