यवतमाळ : शेकोटीजवळ बसलेल्या वृद्धेचा होरपळून मृत्यू | पुढारी

यवतमाळ : शेकोटीजवळ बसलेल्या वृद्धेचा होरपळून मृत्यू

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : कडाक्याची थंडी असल्याने घराशेजारील मोकळ्या जागेवर नेहमीप्रमाणे शेकोटी पेटवून शेकत असताना एका (७५ वर्षीय) वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला. मारेगाव तालुक्यातील मांगली येथे (शनिवारी) सकाळी ही घटना घडली. शकुंतला पुंडलिक भोयर असे मृत वृद्धेचे नाव आहे.

गेल्या काही दिवसांपासून निचांकी तापमानाची नोंद होत आहे. यामुळे जिल्‍ह्यात कडाक्याची थंडी पडली आहे. तापमान १०.७ अंशापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आबालवृद्धांसह सामान्य नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. अशातच (शनिवारी) सकाळी शकुंतला भोयर या घराच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेवर शेकोटी पेटवून बसल्‍या होत्‍या. यावेळी अचानक तिच्या अंगावर असलेल्या ब्लॅकेटला आग लागली. या आगीने चांगलाच भडका घेतला.

शकुंतला ही रस्त्याशेजारील मोकळ्या जागेवर शेकोटी करून शेकत असल्याने ही घटना कोणाच्याच लक्षात आली नाही. त्यानंतर तिने जोराने आरडाओरड केल्याने हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर तिला तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अशातच उपचार सुरू असताना (रविवार) पहाटेच्या सुमारास त्‍यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button