अमरावती : धारणीकडे जाणारी धावती बस पेटली; चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली | पुढारी

अमरावती : धारणीकडे जाणारी धावती बस पेटली; चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : अमरावती धारणी टपाल बस परतवाडाकडून धारणीकडे जात असताना सेमाडोहपासून १० किमी अलीकडे भवईजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक पेटल्याची घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली आणि सर्व प्रवाशी सुरक्षित बचावले. या घटनेमुळे राज्याची जीवन वाहिनीचा प्रवास खरोखरच सुरक्षित आहे काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती आगाराची बस (क्र. एमएच ४० वाय ५३८२ )धारणी टपाल बस चालक मुकद्दर अली व महिला वाहक राऊत अंदाजे १५ ते २० प्रवाशांना घेऊन जात होते. बस सेमाडोहकडून १० किमी अलीकडे भवई प्रवाशी निवार्‍याजवळ आल्यावर एअर पाईप फुटल्याने बसची चाके जाम झाली. यानंतर बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक आग लागली. यानंतर चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली आणि प्रवाशांचा जीव वाचवला.

बस चालकाने प्रवाशांसह मार्गावरुन जाणार्‍या ट्रकचालकाकडून पाणी घेऊन आग विझवली. याच दरम्यान चालक -वाहक आणि प्रवाशानी आग विझवण्यासाठी परिसरातील माती टाकून आग नियंत्रणात आणली. यानंतर वाहकाने सर्व प्रवाशांना अमरावती खंडवा बसने पुढील प्रवासास पाठवले. देव बलवत्तर असल्याने मोठी दुर्घटना टळली आणि सर्व प्रवाशी सुरक्षित राहिले. याबाबत आगार व्यवस्थापक संदिप खवले याना विचारणा केली असता बसमध्ये छोटा तांत्रिक बिघाड असून सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याची त्यांनी माहिती दिली.

बसमध्ये अग्नीशमन यंत्र नाही

प्रवाशी बसमध्ये आग लागल्यास किंवा अपघात झाल्यास अग्नीशमन यंत्र, प्रथमोपचार पेटी असावी हा वाहतुक विभागाचा नियम असताना सदर्हु बस तर सोडाच इतर बसमध्ये या सोई नसल्याचे सर्वत्र दिसून येते. यामुळे या गंभीर प्रकाराबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. घाटवळणाच्या मार्गावरील खडतर प्रवासाच्या बसमध्ये महिला वाहक कायमच कर्तव्यावर असताना अशा जीवघेण्या गंभीर घटना घडल्यास चालकास काय मदत करतील? यावरही प्रवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button