जेजुरीत भरला गाढवांचा बाजार; माणसांच्या भाऊगर्दीत गाढवांची किंमत टिकून | पुढारी

जेजुरीत भरला गाढवांचा बाजार; माणसांच्या भाऊगर्दीत गाढवांची किंमत टिकून

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : बहुजन समाजाचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबादेवाची पौष पौर्णिमेनिमित्त सोमवारपासून (दि. 2) यात्रा सुरू झाली आहे. पारंपरिक पद्धतीने दरवर्षी जेजुरीत पौष पौर्णिमेला गाढवांचा बाजार सुरू झाला आहे. या बाजारासाठी अठरा पगड जाती-जमातीतील महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतून समाजबांधव या यात्रेत सहभागी झाले आहेत. मंगळवारपासूनच या बाजारात गाढवांची खरेदी-विक्री सुरू झाली असून, 30 हजार रुपयांपासून ते 60 हजार रुपयांपर्यंत एका गाढवाला किंमत मिळत आहे.

गाढवांच्या बाजाराला उतरती कळा लागली असली, तरी आधुनिक युगात माणसांच्या भाऊगर्दीत गाढवांची किंमत टिकून आहे.
जेजुरीच्या बंगाली पटांगणात अनेक पिढ्यांपासून गाढवांचा बाजार भरतो. ज्या समाजाचा उदरनिर्वाह गाढवांवर अवलंबून आहे, अशा समाजातील लोक गाढवांची खरेदी-विक्री व कुलदैवताच्या दर्शनासाठी प्रत्येक पौष पौर्णिमेला जेजुरीत येतात.

जेजुरीत भरला गाढवांचा बाजार
वडारी, बेलदार, वैदू, कैकाडी, गारुडी, कुंभार, भातुकोल्हाटी, परीट आदी अठरा पगड जाती-जमातीचे, बलुतेदार-अलुतेदार समाजाचे लोक या यात्रेत सहभागी होतात. समाजातील अनेकांची उपजीविका गाढवावर अवलंबून आहे. डोंगर पठारावर जेथे रस्त्याची सोय नाही, तेथे दगड, माती, वाळू, विटा तसेच विविध सामान वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. सध्याच्या यंत्रयुगात मोटारी, टेम्पो आदी वाहने आल्याने गाढवाच्या पाठीवरचे ओझे कमी झाले आहे. असे असले तरी माणसांच्या भाऊगर्दीत गाढवांची किंमत टिकून आहे.

दोन ते तीन दिवस चालणार्‍या गाढवांच्या बाजारासाठी गुजरातमधील अमरेली, सौराष्ट्र या भागातून केवळ 110 गाढवे विक्रीसाठी येथे आली आहेत. कर्नाटक,आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, परभणी, सातारा आदी विविध भागांतून सुमारे एक हजारांपेक्षा अधिक गाढवे दाखल झाली आहेत. मंगळवारपासून गाढवांच्या खरेदी-विक्रीला सुरुवात झाली आहे.

पुणे येथील गाढवांचे व्यापारी बापू ऊर्फ पिंटू धोत्रे यांनी या बाजारात 100 गाढवे आणली होती. बाजारात गाढवांची संख्या कमी असल्याने त्यांच्या प्रत्येक गाढवाला 50 हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला. पूर्वी जेजुरीच्या या बाजारात तीन ते चार हजार गाढवांची खरेदी-विक्री होत होती. मात्र, यांत्रिक युगात गाढवांची संख्या कमी झाल्याने यंदा केवळ एक हजार गाढवे बाजारात खरेदी-विक्रीसाठी आली आहेत.

किंमत ठरते वय आणि दातांवरून
गाढवांची किंमत त्यांचे वय व दातांवरून ठरते. गावठी गाढवांची 30 ते 40 हजारांपर्यंत विक्री होते, तर काठेवाडी गाढवांना चांगली किंमत असून, 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत त्याची विक्री होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून आंध— प्रदेश व कर्नाटकातून गाढवांच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने व्यापारी येतात.

Back to top button