मानवरहित चाचणीनंतरच होणार गगनयानचे प्रक्षेपण : इस्त्रो अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ | पुढारी

मानवरहित चाचणीनंतरच होणार गगनयानचे प्रक्षेपण : इस्त्रो अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ‘गगनयान मिशन’ची घोषणा केली होती. मुळात हे लक्ष्य २०२२ मध्ये साध्य करावयाचे होते. तथापि, कोरोना महामारीमुळे यात पुन्हा विलंब झाला. सहा महत्वपूर्ण मानवरहित चाचण्यांच्या यशस्वीतेनंतरच महत्वाकांक्षी मानव अंतराळ यानाचे प्रक्षेपण करण्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी नागपुरातील सायन्स काँग्रेसच्या निमित्ताने आज पत्रपरिषदेत दिली.

‘गगनयान मिशन’ अर्थात भारताकडून मानव अंतराळात पाठविण्याचे अभियानासाठी संपूर्णत भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार हे विशेष आहे. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी तत्पूर्वी अंतराळ विज्ञानावर आयोजित सत्रामध्ये मार्गदर्शन केले.

डॉ. सोमनाथ म्हणाले की, भारताच्या अंतराळ धोरणाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये अंतराळ धोरणाच्या पहिल्या मसुद्यावर चर्चा झाल्यानंतर, अंतराळ विभागाने त्यावर काम केले. आता हा मसुदा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. हे धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाकडे जाण्यापूर्वी प्रधानमंत्री कार्यालय, संबंधित विभाग आणि मंत्रालयांशी सल्लामसलत करणार असल्याचे सोमनाथ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चंद्रयान ३ मोहीमेबाबत त्यांनी सांगितले की, या मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून सेफ लॅण्डींगवर आमचा भर आहे. चंद्रयान-३ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. चंद्रयान १ आणि 2 नंतर इस्रो लवकरच चंद्रयान-३ लाँच करणार आहे. चंद्रयान-३ चे काम वेगाने सुरू आहे. भूतकाळातील उणिवांपासून धडा घेत भारताचे शास्त्रज्ञ चंद्रयान-३ मोहिमेत परिश्रमपूर्वक काम करीत आहेत.

चंद्रयान-२ चा ऑर्बिटर चंद्रयान-३ मिशनमध्ये वापरला जाईल. ते खूप फायदेशीर ठरेल. चंद्रयान-३ अगदी चंद्रयान-२ सारखेच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. कारण चंद्रयान-२ च्या ऑर्बिटरकडून यासाठी मदत घेण्यात येणार आहे असे सोमनाथ यांनी सांगितले. नवीन धोरणामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) संशोधन आणि विकास आणि क्षमता विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच या क्षेत्रात खाजगी संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रोचा प्रयत्न राहणार आहे. अनेक भारतीय खाजगी कंपन्या आणि स्टार्ट-अप्स अंतराळ सहभाग सेवा देण्यासाठी उत्सुक आहेत. केंद्र सरकारही यासाठी अनुकूल आहे.

खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिल्याने जागतिक अंतराळ बाजारपेठेत स्पर्धा निर्माण होऊन सक्षम होईल आणि त्यामुळे अवकाश आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये अनेक नोकऱ्या निर्माण होतील, असे सोमनाथ यांनी सांगितले. बंगळुरू येथे इस्त्रोच्या दुसऱ्या प्रक्षेपण केंद्राच्या बांधकामाचा आराखडा पूर्ण झालेला आहे. फक्त भूमिअधिग्रहण राहिले आहे. तेवढे झाले की लगेचच बांधकाम सुरू केले जाईल असेही ते म्हणाले.

सोमनाथ म्हणाले की, अंतराळ कचरा ही मोठी समस्या आहे. त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवले जात आहे. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अवकाश कचऱ्याचे वीस हजार तुकडे असून त्यात अग्निबाणांचे सुटे भाग, निकामी उपग्रह व इतर वस्तूंचा समावेश आहे. कचऱ्याच्या रूपातील कोट्यवधी निरुपयोगी वस्तू अवकाशात फिरत आहेत. सोडल्या जाणाऱ्या नव्या उपग्रहांना यातले काही निरुपयोगी उपग्रह अथवा कचऱ्यामधील काही घटक धडकण्याची शक्यता असते याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले.

हेही वाचलंत का?

Back to top button