चंद्रपूरात महाऔष्णिक वीज केंद्रातील २ युनिट बंद; ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडीत | पुढारी

चंद्रपूरात महाऔष्णिक वीज केंद्रातील २ युनिट बंद; ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडीत

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम चंद्रपूरातील महाऔष्णिक वीज केंद्रावर झाला आहे. संपूर्ण राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या महाऔष्णिक वीज केंद्रातील 4 व 5 क्रमांकाचे दोन युनिट बंद झाले आहेत. त्यामुळे राज्यातील वीज पुरवठ्यावर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरात चौदाशे वीज कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आज सकाळपासून ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याचे दिसून आले आहे.

आज मध्यरात्री पासून महावितरण कंपनीने संपाचे हत्यार उपसले आहे. वीज वितरण कंपनीचे खासगीकरण होत असल्याने कर्मचाऱ्यांनी त्याला कडाडून विरोध करून राज्यभर संप करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीपासून सुरू झालेल्या संपाचा परिणाम आज (बुधवारी) चंद्रपूरात दिसून आला आहे. राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या चंद्रपूर येथील महाऔष्णिक वीज केंद्रातील दोन संच बंद पडले. त्यामुळे वीज निर्मितीला फटका बसला आहे. 210 मेगावॅट क्षमतेचा युनिट 4 तसेच 500 मेगावॅट क्षमतेचा युनिट 5 हे दोन्ही युनिट बंद झाले आहेत. युनिट क्रमांक 4 मध्ये एअर हिटरची समस्या निर्माण झाली आहे. तर युनिट 5 मध्ये कोळशाची राख बाहेर निघण्याच्या प्रक्रियेत बिघाड आला आहे. त्यामुळे दोन्ही युनिट बंद झाल्याने 710 मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती थांबली आहे. या वीजनिर्मितीचा राज्याच्या वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील चौदाशे वीज कर्मचारी संपात सहभागी झाल्याने वीज पुरवठा ठिकठिकाणी खंडीत झाला आहे. सकाळपासूनच ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याचे दिसून आले आहे. खासगीकरणाला वीज कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध करीत संप पुकारल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याची चर्चा ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे. राज्यशासनाने संपावर तोडगा काढला नाही तर अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता नकारता येत नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button