श्रीनगर: पुढारी ऑनलाईन : जम्मू- काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) 'ऑपरेशन ऑलआउट' मोहीम सुरू ठेवत सुरक्षा दलांनी २०२२ मध्ये ४२ परदेशींसह १७२ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये ९३ यशस्वी चकमकी करत या कारवाया केल्या आहेत, अशी माहिती काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांच्या हवाल्याने पोलिसांनी आज (दि.31) ट्विटरवरून दिली आहे.
१७२ दहशतवाद्यांपैकी १०८ दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा आणि या संघटनेशी संबंधित 'टीआरएफ'चे होते. 2022 मध्ये या दोन्ही दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीर खोऱ्यात नागरिकांना लक्ष्य करत हत्या केल्या होत्या. त्यामुळे या संघटनांचा बंदोबस्त करण्याचे सुरक्षा दलांसमोर एक गंभीर आव्हान होते; परंतु सुरक्षा दलांनी ऑपरेशन ऑलआउट राबवित या संघटनांचे कंबरडे मोडले. या वर्षात काश्मीरमध्ये एकूण 93 यशस्वी चकमकी झाल्या. यामध्ये लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफ या संघटनेच्या सर्वाधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. त्याचबरोबर जैश ए मोहम्मद – 35, हिजबुल मुजाहिद्दीन – 22, अल-बद्र – 4 आणि अंसार गजवातुल उल हिंदच्या 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. (Jammu and Kashmir)
पुलवामामध्ये 17 यशस्वी चकमकी
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यांमध्ये 2022 मध्ये सर्वाधिक चकमकी झाल्या. पुलवामामध्ये झालेल्या १७ यशस्वी चकमकीत जैश ए मोहम्मदचे १७, लष्कर-ए-तोयबाचे १६ आणि अंसार गजवातुल उल हिंद आणि अल-बदर चे प्रत्येकी २असे 37 दहशतवादी ठार झाले.
शोपियान जिल्ह्यात चकमकीत २६ दहशतवादी ठार
शोपियान जिल्ह्यात सुमारे 19 चकमकी झाल्या. त्यामध्ये 26 दहशतवादी मारले गेले. त्यात लष्कर-ए-तोयबाचे 20, जैश ए मोहम्मदचे 4 आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या २ दहशतवाद्यांचा समावेश होता.
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्येदेखील 17 चकमकी झाल्या. ज्यामध्ये एलईटीशी संबंधित 31 दहशतवादी आणि जेईएमचे 7 दहशतवादी ठार झाले.
राजधानी श्रीनगरमध्ये 11 चकमकी झाल्या. ज्यामध्ये 15 एलईटीशी आणि अंसार गजवातुल उल हिंदचे 4 अशा 19 दशहतवाद्यांना ठार करण्यात आले.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग आणि कुलगाम जिल्ह्यातही सुरक्षा दलांनी केलेल्या २१ चकमकीत ३७ दहशतवाद्यांना ठार केले.
दरम्यान, 2022 मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत ६ जवान शहीद झाले, तर ५२ जखमी झाले. सुरक्षा दलांनी १३० दहशतवाद्यांच्या साथीदारांना अटक केली आहे.
हेही वाचलंत का ?