विटा: पुढारी वृत्तसेवा : ज्यांनी रिक्षा चालवून आपले नाव मोठे केले, अशा मुख्यमंत्र्यांचे संस्कार काढण्याइतके तुम्ही मोठे झालात का ? असा सवाल करत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची आणि मतदारांची माफी मागावी, अशी जाहीर मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केली आहे.
खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर अपेक्षेप्रमाणे राजकीय पटलावर कोणाच्या किती ग्रामपंचायती यावरून दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरू झाली आहे. वैभव पाटील यांनी तुमच्यावर एकनाथ शिंदेंच्या खोक्यांचे संस्कार झाले आहेत. शिंदेंच्या प्रमाणे खोके देऊन आमच्यातल्या काही लोकांना काहीतरी देऊन तिकडे घेणार आहात की काय ?, असा सवाल आमदार अनिल बाबर यांना केला होता. त्यावर आज सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
सुहास बाबर म्हणाले की, ज्यांच्या राजकारणाचा बेसच अर्थकारण आहे. तेच आमच्यावर मतदान करण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप करत आहेत. आम्ही एका तरी सरपंचाला आमिष दाखविले. दबाव आणला असेल, तर ते सिद्ध करा, अन्यथा जनता तुम्हाला धडा शिकवेल, असे इशारा दिला.
सुहास बाबर म्हणाले, निकालानंतर निवडून आलेले सरपंच आम्हाला भेटण्यासाठी येत होते. त्यामुळे काहींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. साहजिकच या निकालाचे पडसाद विटा शहरात उमटू लागले आहेत. त्यामुळे काहींनी सोशल मीडियावरून ग्रामपंचायतीवर खोटे दावे सुरू केले होते. त्यामुळे आम्ही आमच्या किती ग्रामपंचायती आल्या हे सांगितले. आम्हाला मिळालेले यश जाहीर सांगणे, यामध्ये आमचा कसला ॲटीट्यूड होता. तुम्ही फारच कर्तृत्ववान आहात, तर येणाऱ्या विटा पालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरा आणि बाहेरगावी जावा. विटेकर तुमची काय अवस्था करतील, हे दिसून येईल. आमच्यावर पैशाचा आरोप करत असाल, तर तुमची संपत्ती एकदा जाहीर करा. आम्ही आमची संपत्ती जाहीर करू, पण एकदा जनतेच्या दारात सोक्षमोक्ष होवूनच जावू दे, असे आव्हान बाबर यांनी पाटील यांना दिले.
हेही वाचा :