चंद्रपूर : साखरी गावात ‘दारू हद्दपारी’साठी महिलांचा एल्‍गार; पोलीस स्टेशनवर धडक | पुढारी

चंद्रपूर : साखरी गावात 'दारू हद्दपारी'साठी महिलांचा एल्‍गार; पोलीस स्टेशनवर धडक

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात राजूरा तालुक्यातील करोडपती गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्‍या ‘साखरी’ गावात व्यसनाधिनता वाढली आहे. त्यामुळे महिलांनी कुटुंबातील लोकांचा विरोध पत्करून दारूला गावातून हद्दपार करण्याचा संकल्प केला. सामाजिक कार्यकर्ते अंकुश गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी रस्त्यावर उतरून राजुरा पोलीस स्टेशन येथे धडक दिली. यावेळी गावात सुरू असलेल्या अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाही करण्याची मागणी महिलांनी पोलिसांकडे केली. यावर प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष दरेकर यांनी याची तात्‍काळ दखल घेतली. पोलिसांना गावात पाठवून अवैद्य दारू विक्रेते व त्यांच्याजवळील दारू जप्त करण्यात आली.

राजूरा तालुक्यातील करोडपती गाव म्हणून ख्याती असलेले साखरी गाव सध्या अवैद्य धंद्याचे माहेरघर बनले आहे. या ठिकाणी कोळसा चोरी, डिझेल चोरी, भंगार चोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून, गावातच खुलेआम टेबल लावून अवैद्य दारूची विक्री मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या ठिकाणी काही नागरिक आपल्या लहान मुलांना सुद्धा दारू आणण्यासाठी पाठवीत आहेत. यामुळे नवीन पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे येथील बचत गटाच्या महिलांनी व इतर महिलांनी सामाजिक कार्यकर्ते अंकुश गोरे यांना सांगून त्यांच्या नेतृत्वात गावात दारू बंदी करण्याचा निर्धार केला. ग्रामसभेत दारू बंदीचा ठराव मांडला असता, काही आंबट शौकिनांनी याला विरोध दर्शविला.

गावात सुरू असलेल्या अवैद्य दारू विक्रेत्यांना या अगोदरच अवैद्य दारू विक्री न करण्याच्या सूचना महिलांनी व अंकुश गोरे यांनी त्यांच्या घरी जाऊन दिल्या होत्या. तरी दारू विक्रेते येथील काही आंबट शौकीनांच्या भरवशावर दारू विक्री राजरोसपणे करीत आहेत. अवैद्य दारू विक्रीला महिलांनी विरोध केल्यानंतर काही दारू विक्रेत्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर दारू विकेत्‍यांची मुजोरी वाढली आहे. दिवसाढवळ्या खुलेआम दारू विक्री होत असताना गावातील सरपंचांनी दारूबंदीला सहकार्य न केल्याने त्यांच्या विरोधातही महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

गावातील तीस ते चाळीस महिलांनी अवैद्य दारू विक्रेत्यांच्या विरोधात राजुरा पोलीस स्टेशन मध्ये नुकतीच धडक दिली. प्रभारी ठाणेदार संतोष दरेकर यांनी लगेच ऑक्शन घेऊन साखरी येथे पोलीस कर्मचारी पाठवले. अवैद्य दारू विक्रेते विशाल वांढरे व धनराज जयपूर यांना मुद्देमलासह ताब्यात घेतले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंकुश गोरे, बबन उरकुडे, पोलीस पाटील उरकुडे, गावातील बचत गटाच्या महिला व इतर महिला, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

हेही वाचा : 

Back to top button