नागपूर : गोळीबारात जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू | पुढारी

नागपूर : गोळीबारात जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील कन्हान खाण परिसरातील गोळीबारात गंभीर जखमी जवानाचा अखेर कामठी येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. वेकोलीच्या खाण क्रमांक सहा परिसरात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेला मिलिंद समाधान खोब्रागडे (वय २९, मूळ रा. अकोला) याच्यावर कामठीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणात पोलिसांनी समीर सिद्दीकी (वय २९ रा. कॉलरी टेकडी) व राहुल जेकब (वय २६ रा. कांद्री) या दोघांना अटक केली असून न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी समीर व वेकोलीच्या इंदर कॉलनी परिसरात तैनात जवानाचा वाद झाला होता. त्यानंतर समीर हा या जवानाचा शोध घेत होता. मिलिंद हे परिसरात गस्त घालत होते. समीर व जेकब मोटारसायकलने या भागात संशयास्पद स्थितीत फिरताना मिलिंद यांना दिसले. मिलिंद यांनी त्यांना हटकले. वाद विकोपाला जाताच समीरने पिस्तुलातून मिलिंद यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी जखमी मिलिंद यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर पोलीस अधीक्षक विशाल आनंद शिंगुरी, उपविभागीय पोलिस अधिकारी मुख्तार बागवान यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कन्हान गाठून शिताफीने शोध घेत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. जखमी जवानाला दाखल केलेल्या रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

हेही वाचंलत का?

Back to top button