

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा काही एक संबंध नसताना केवळ राजकारणाचा भाग म्हणून, सूड भावनेतून त्यांना गोवण्यात आले. आज न्यायालयात त्यांना जामीन मिळाला आहे. पण लगेच १० दिवसांची स्थगिती देण्यात आली. मात्र, या प्रकरणाचा निकाल जेव्हाही येईल, तेव्हा अनिल देशमुख हे निर्दोष मुक्त होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्च्यूअल रॅलीसाठी ते आज नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, देशमुख यांना जामीन मिळताच देशमुख समर्थक, राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी जल्लोष साजरा केला.
पाटील म्हणाले की, अनिल देशमुखांनी आपली बाजू न्यायालयात मांडली. आज त्यांना जामीन झालेला असला, तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कायद्याच्या आधारे बघितले, तर एका गुन्हेगाराला माफीचा साक्षीदार करणे, चुकीचे आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील लोकांमध्ये तीव्र संताप आहे. त्यामुळे केंद्र सरकारने योग्य ती कारवाई या प्रकरणात केली पाहिजे, अशी महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. ग्रामपंचायतीमध्ये आमच्या विचारांचा माणूस निवडून आला नाही, तर निधी देणार नाही, अशी धमकी भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. यावर पाटील म्हणाले की, त्यांची जी प्रवृत्ती आहे, त्यानुसार ते बोलतात, असा टोला त्यांनी राणे यांना लगावला.
हेही वाचलंत का ?