जालना : वाहतूक नियम मोडणार्‍यांकडून ६ कोटींचा दंड थकीत; कोर्टामार्फत येणार नोटीस | पुढारी

जालना : वाहतूक नियम मोडणार्‍यांकडून ६ कोटींचा दंड थकीत; कोर्टामार्फत येणार नोटीस

जालना, पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांना आता ऑनलाइन पद्धतीने दंडाचे चलन दिले जाते. गेल्या अकरा महिन्यांत या ऑनलाईन चलन पद्धतीने दिलेल्या दंडाची तब्‍बल सहा कोटी रुपयांची रक्कम जिल्ह्यातील वाहनचालकांकडे थकीत आहे. या वसुलीसाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने कोर्टामार्फत नोटीस पाठविण्यात येणार आहे.

वाहतूक विभागास अद्ययावत करण्यासाठी सन 2019 मध्ये वाहतूक पोलिसांकडे ‘एम स्वॅप’ मशीन देण्यात आले. त्याच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनाच्या नंबरप्लेटचा फोटो काढून सिस्टिममध्ये अपलोड करायचा असतो. यानंतर संबंधित वाहनचालकाच्या नावावर दंड पडतो. हा दंड जागेवरच भरला नाही, तरी वाहन जप्त न करता सोडून देण्यात येते. १५ दिवस ते महिनाभराच्या आत वाहनचालकाच्या नोंदणीकृत पत्त्यावर दंडाची पावती पाठवली जाते. वाहनचालकाने जागेवरच दंड भरणे अपेक्षित आहे; परंतु अनेकवेळा नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांचे फोटो पोलीस घेतात. यावेळी दंड भरण्यासाठी वाहनचालक तेथे हजर नसतात.

ट्रिपल सीट असलेले वाहनचालक धूम ठोकून पळून जातात; परंतु पोलिसांकडे फोटो असल्यामुळे ऑनलाइन दंड करता येतो. या अद्ययावत यंत्रणेमुळे रस्त्यावर वाहतूक पोलीस व वाहनचालकांत होणारे वाद, बाचाबाची हे प्रकार आता थांबले आहेत.
वाद घालणार्‍या वाहनचालकांना पोलीस काहीही न बोलता केवळ नंबरप्लेटचा फोटो काढून दंड ठोठावत असतात; परंतु ऑनलाईन दंड भरण्यासाठी वाहनचालक उदासीन असल्याचे या दोन वर्षात दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षात केवळ जवळपास ४० लाख रुपये ऑनलाइन दंडाचे वसूल झाले आहेत. दंड ठोठावलेली अनेक वाहने दंड न भरताच सर्रासपणे रस्त्यावर फिरत आहेत.

शहर वाहतूक शाखेच्या वतीने सन 2021 या वर्षात 50 हजार 354 वाहनावर कारवाई करत एक कोटी 26 लाख रूपयांचा दंड ठोठवला होता. यानंतर 1 जानेवारी ते 30 नोव्हेब 2022 पर्यत 58 हजार 883 वाहनांवर कारवाई करत चार कोटी 98 लाख 78 हजार नऊशे रूपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. दोन वर्षात सहा कोटी 25 लाख 72 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. चालू वर्षात केवळ वीस लाख रूपयांची वसुली झाली आहे.

आठ प्रकारचे नियम

शहर वाहतूक शाखेच्या वतीने विना हेल्मेट, सीटबेल्ट नसणे, मोबाइलवर बोलणे, विना इन्शुरन्स, फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा लावणे, ट्रीपल सीट, अवैध वाहतूक असे वाहतुकीचे निमय तोडणार्‍यांवर कारवाई करण्यात येते.

यामुळे थकबाकी वाढते

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी असलेला मोबाईल क्रमांक व पत्ता यावर ऑनलाईन दंडाची माहिती पाठवली जाते. यात मोबाइल बंद असणे, पत्ता बदललेला असल्यास वाहन चालकांपर्यंत दंडाची माहिती पोहोचत नाही. परिणामी थकबाकीची रक्कम वाढत आहे.

लोकअदालतीत वीस लाखांची झाली वसुली

ऑनलाइन दंडाची वसुली होत नसल्याचे लक्षात आल्याने पोलीस अधीक्षक यांच्या सुचनेनंतर संबंधित वाहनचालकांना न्यायालयातून नोटीस पाठवून लोकअदालतीमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. या वर्षात झालेल्या दोन लोक अदालतीत जवळपास वीस लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वसुलीचे प्रमाण किरकोळ असल्याचे दिसून येत आहे.

ज्या वाहनचालकांकडे दंडाची रक्कम थकीत आहे. अशा वाहनधारकांनी तत्काळ आपला दंडा भरावा. कोर्टामार्फत वाहनचालकांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. याशिवाय विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते आहे. त्यात ज्यांच्याकडे दंड थकीत आहे, अशा वाहन चालकांकडून जागेवरच दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे.

– गुणाजी शिंदे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, जालना

हेही वाचा :

Back to top button