Pushpa Dravid : राहुल द्रविड यांच्या आई, प्रसिद्ध चित्रकार पुष्‍पा द्रविड यांच्‍या आत्मचरित्रात बुलढाण्याच्या मानस कन्येचं कौतुक!        | पुढारी

Pushpa Dravid : राहुल द्रविड यांच्या आई, प्रसिद्ध चित्रकार पुष्‍पा द्रविड यांच्‍या आत्मचरित्रात बुलढाण्याच्या मानस कन्येचं कौतुक!       

बुलढाणा,पुढारी वृत्तसेवा: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid)यांच्या आई डॉ. पुष्पा द्रविड (Pushpa Dravid) यांच्‍या  ‘कॅनव्हास टू वॉल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन पुणे येथील भांडारकर संस्थेत  झाले. या पुस्तकात त्यांनी बुलढाण्याच्या  संगीता अभय राजनकर यांचा उल्लेख केला आहे. संगीता  राजनकर या पुष्पा द्रविड यांच्या मानसकन्या आहेत.

Pushpa Dravid : आत्मचरित्रात  बुलढाण्याच्या संगीता राजनकर यांचा उल्लेख

डॉ. पुष्पा द्रविड या टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या आई आहेत. त्यांची फक्त राहुल द्रविड यांच्या आई अशी ओळख नाही तर त्या प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार आहेत. त्यांनी बंगळूरच्या प्रसिद्ध चिन्नास्वामी स्टेडियमवर ४.५ हजार चौरस फूट भित्तीशिल्प व यासारख्या अनेक शिल्पांची निर्मिती केली आहे. डॉ. पुष्पा यांचा जीवन प्रवास रेखाटणारं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झाले. याचे प्रकाशन पुण्यातील भांडारकर संस्थेत  झाले. या  पुस्तकात त्यांनी  बुलढाण्याच्या  संगीता अभय राजनकर यांचा कौतुकास्पद उल्लेख केला आहे. संगीता  राजनकर या पुष्पा द्रविड यांच्या मानसकन्या आहेत. मूळचे बुलढाण्याचे असलेले अभय व संगीता राजनकर हे कलावंत दाम्पत्य  बेंगलोरस्थित भारतातील अग्रगण्य जाहिरात कंपनीत नोकरी करतात. नोकरीतील जबाबदारी संभाळताना संगीता यांनी आपल्यातील कलावंत जिवंत ठेवला आहे. त्‍या  चित्रकार व शिल्पकार म्हणून नावारुपास आल्या.

पुष्पा द्रविड यांच्या  ‘कॅनव्हास टू वॉल’ या पुस्तकात संगीता यांच्यावर दोन पाने मजकूर असून, यात पुष्पा आणि संगीता यांचा डिसेंबर २००७ मधील भेटीचा प्रसंग सांगितला आहे. संगीता यांनी पुष्पा द्रविड यांना ‘मावशी’ म्हणून मारलेली हाक. त्या भेटीतून जुळलेले ऋणानुबंध, एक व्यक्ती व कलावंत म्हणून संगीताचे असलेले वेगळेपण यावर प्रकाश  टाकला आहे. संगीता आणि त्यांचे पती अभय हे  शिल्पकार व चित्रकार असून, भगवान बुद्ध व अजिंठा यावर बीबीसी लंडनच्या ‘डॉक्युमेंटरी’ मध्ये त्यांचा समावेश आहे.

हेही  वाचा : 

Back to top button