पुणे : पुढारी वृत्तसेवा : पिंपळेवस्ती, मुंढवा परिसरात राहणार्या एका ज्येष्ठ दाम्पत्याला नोकराने जेवणातून गुंगीचे औषध देऊन रोकड, हिरे, सोन्याचे दागिने, असा तब्बल 23 लाख 98 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी दोघांना जाग आली तेव्हा नोकर पसार झाला होता. रविवारी (दि. 4) रात्री फॉरेस्ट कॅसल सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी एका 37 वर्षीय महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नोकर नरेश शंकर सौदा (वय 22) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे आई-वडील हे सेवानिवृत्त झाले असून, दोघे एकटेच राहतात. त्यांना घरातील कामासाठी नोकराची गरज होती. ऑनलाइन नोकराची सेवा उपलब्ध करून देणार्या एका कंपनीमार्फत मुंबईहून त्यांनी नरेश याला कामासाठी पुण्यात आणले होते. तो मूळचा नेपाळ येथील राहणारा आहे. एक महिन्यापासून तो त्यांच्याकडे काम करीत होता. पगाराचे पैसेही त्याने महिना पूर्ण झाल्यानंतर घेतले होते.
एकेदिवशी त्याने जेवणामधून फिर्यादीच्या आई-वडिलांना जेवणातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर घरातील रोकड, सोन्याचे, हिर्याचे दागिने असा 23 लाख 98 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून पळ काढला. दुसर्या दिवशी जाग आल्यानंतर घरातील नोकर गायब झाला असून घरातील किंमती ऐवज नसल्याचे लक्षात आल्यानंतर दाम्पत्याला घरात चोरी झाल्याचे समजले. या प्रकाराची सोसायटीतील एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दाम्पत्याला वैद्यकीय मदत दिली. नोकराला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याचे लकडे यांनी सांगितले.
शहरात पूर्वीदेखील नोकराने एकटे राहत असलेल्या दाम्पत्याला लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. कोथरुड परिसरात काम करणार्या एका केअरटेकरने रात्रीच्या वेळी दरोडा टाकून दाम्पत्याला लुटले होते. तर चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत औंध परिसरात देखील तेथे काम करणार्या एका नोकरानेच दाम्पत्याला कोंडून मारहाण करीत घरातील ऐवज चोरी केला होता. त्यामुळे प्रामख्याने नोकर किंवा केअरटेकर कामावर ठेवताना, त्याची पूर्ण माहिती पोलिस ठाण्याला कळवून, त्याच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे तर दाखल नाहीत ना याची खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.