राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, पण त्यांना बदलण्याचा अधिकार आम्हाला नाही : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, पण त्यांना बदलण्याचा अधिकार आम्हाला नाही : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यपालांचे पद हे घटनात्मक पद असून त्यांना ठेवायचे की नाही, याचा अधिकार आम्हाला नाही. ज्यांना याबाबत अधिकार आहेत, तेच निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर येथे ते बोलत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्धल केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यांच्या राजीनाम्याची तसेच हकालपट्टीची मागणी विरोधकांकडून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका पुन्हा एकदा माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर कोणीही करू नये. राज्यपालांचे समर्थन करणारी कोणाचीच भूमिका नाही, हे स्पष्ट करताना त्यांना ठेवायचे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार आम्हाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

बावनकुळे म्हणाले, खासदार उदयनराजे असोत किंवा आम्ही, आमच्यापैकी कोणाचीही भूमिका राज्यपालांचे समर्थन करणारी नाही. मात्र, हे घटनात्मक पद आहे. त्यादिवशी राज्यपालांची चूक झाली. त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणात आदित्य ठाकरे खोटे बोलत आहेत. मागील सरकारने वेदांताला कुठलीही जागा दिलेली नाही, कुठलीही बैठक घेतलेली नाही, अशी माहिती आरटीआयमधून पुढे आली आहे. वेदांता प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळेच गेला, या आरोपावर ठाम असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले. मात्र, अडीच वर्षे कधीही आढावा घेतला नाही. खरीपाच्या आढावा बैठका सुद्धा त्या काळात झाल्या नाहीत. विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. विमा कंपन्यांच्या प्रकरणात जो भ्रष्टाचार झाला आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button