चंद्रपूर : बल्लारपूर लोखडी पूल दुर्घटनाप्रकरणी रेल्वेचे दोन अधिकारी निलंबित | पुढारी

चंद्रपूर : बल्लारपूर लोखडी पूल दुर्घटनाप्रकरणी रेल्वेचे दोन अधिकारी निलंबित

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील रेल्वे दुर्घटनेप्रकरणी रेल्वे विभागाने इन्स्पेक्टर ऑफ वर्क जी. जी. राजुरकर व याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. बल्लारपूर रेल्वे लोखंडी पूल दुर्घटनेप्रकरणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी घटनास्थळी भेट दिली होती. या प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे केली होती. त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्‍यात आली आहे.

रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील पादचारी लोखंडी पुलाचा काही भाग तुटला.  १७ प्रवाशी ३० फूट उंचीच्या पुलावरून खाली कोसळले. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले. गंभीरज जखमी शिक्षिका निलीमा रंगारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. धानोरकर यांनी रूग्णालयात जावून जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करून योग्य उपचार करण्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकाला सुंदर रेल्वे स्थानकाचे नामांकन देण्यात आले होते. मात्र, सौंदर्यकरणासोबत मजबुतीकरण झालेले नाही, त्यामुळे लोखंडी पूलाचा काही भाग कोसळल्याचा आरोप करण्यात आला. चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वेस्थानक यांना प्रथम क्रमांक येऊनही येथील बांधकाम मजबुतीकरणावर रेल्वे अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने ही घटना घडल्याचा आरोप करीत कंत्राटदारासह रेल्वे अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृताच्‍या  कुटुंबातील सदस्याला रेल्वेत नोकरी द्यावी अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली होती. या मागणीची दखल केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे.

सात महिन्यांपूर्वी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. मात्र, ते योग्य पद्धतीने केले गेले नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली असा आरोप करून दुर्घटनेतील दोन अधिकाऱ्यांना दोषी मानले आणि इन्स्पेक्टर ऑफ वर्क जी. जी. राजुरकर व तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव रेल्वे प्रशासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button