गडचिरोली : ७० लाखांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० नक्षल्यांना अटक | पुढारी

गडचिरोली : ७० लाखांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० नक्षल्यांना अटक

गडचिरोली, पुढारी वृत्‍तसेवा : नक्षलवादी असल्याचे सांगून बांधकाम कंत्राटदाराकडून ७० लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० नक्षल समर्थकांना अहेरी तालुक्यातील पेरमिली उपपोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.

चैनू आत्राम(३९),दानू आत्राम (२९) दोघेही रा. आलदंडी, शामराव वेलादी(४५), संजय वेलादी(३९), किशोर सोयाम (३४) तिघेही रा.चंद्रा, बाजू आत्राम(२८), रा. येरमनार टोला, मनिराम आत्राम( ४५) रा. रापल्ले, जोगा मडावी(५०) रा. येरमनार टोला,लालसू तलांडे(३०) रा. येरमनार व बजरंग मडावी( ४०) रा.मल्लमपल्ली ता. अहेरी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

काही जणांनी नक्षल्यांच्या वेशभूषेत ५ नोव्हेंबरच्या रात्री बांडिया नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामस्थळी जाऊन तेथील कर्मचाऱ्याचे अपहरण केले. त्यानंतर त्यास ७० लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास बांधकाम साहित्याची जाळपोळ करुन जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता सर्व जण नक्षल समर्थक असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी उपरोक्त १० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नक्षल गणवेश, भरमार बंदुका व अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा  

एसटीने तीन महिन्यांत ९४ लाख प्रवाशांचा प्रवास; १८ कोटी रुपयांचे उत्पन्न

धुळे : पिस्तुलाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार ; संशयित आरोपीला अटक

आम्ही कसं जगायचं? सेवानिवृत्त एसटी कामगारांचा सरकारला सवाल

Back to top button