यवतमाळ : खा. श्रीकांत शिंदे यांच्या पोकळी कारखान्याच्या भेटीवर उमरखेडमध्ये तर्कवितर्कांना उधाण        | पुढारी

यवतमाळ : खा. श्रीकांत शिंदे यांच्या पोकळी कारखान्याच्या भेटीवर उमरखेडमध्ये तर्कवितर्कांना उधाण       

उमरखेड; पुढारी वृत्तसेवा :  पूर्वनियोजित दौरा नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांनी उमरखेड दौऱ्यावर येत मंगळवारी ( दि. १५) पोफाळी येथील वसंत साखर कारखान्याची पाहणी केली. शिंदे यांच्या दौऱ्यासाठी रातोरात हेलीपॅडही बनवण्यात आले होते. हा कारखाना आरोग्यमंत्री सावंत यांच्या भैरवनाथ शुगरने  भाडेतत्वावर घेतला आहे.  खासदार  हेमंत पाटील हे भागीदार आहेत. दरम्यान, खासदार शिंदे यांनी सहपत्निक येऊन कारखान्याची पाहणी केली. त्यामुळे हा कारखाना नेमका कोणी चालवायला घेतला? असा प्रश्न उमरखेडकरांसमोर निर्माण झाला आहे.

 पंधरा वर्षासाठी भाडेतत्त्वावर!

पाच वर्षापासून बंद असलेला वसंत कारखाना भैरवनाथ शुगरने पंधरा वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतला आहे. मात्र अद्याप भैरवनाथ शुगरचे प्रमुख आरोग्यमंत्री तानाजी सावंत पोफाळीला आलेले नाहीत. आता खा. श्रीकांत शिंदेंच्या एन्ट्रीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. खासदार शिंदे माहूर येथे सपत्नीक श्री रेणूका मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्यासोबत सिनेअभिनेते मंगेश देसाई यांचीही उपस्थिती होती.

या वेळी खासदार शिंदे यांनी उमरखेड, महागाव, पुसद, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा कसा मिटवता येईल? आणि पैनगंगा नदीचे शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचे कसे नियोजन करता येईल? या सर्व  मूलभूत बाबींचा आढावा घेतला.  सोबतच जलसिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जलसंधारण, पाटबंधारे, विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून पैनगंगा नदीलगतच्या बागायतदार शेतकऱ्यांना  पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा केली.

यावेळी  गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील, माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर,कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक  (एमडी ) शैलेंद्र कटियार,अजय देशमुख सरसमकर, सदाशिव पुंड, प्रा. सुरेश कटकमवार, गव्हाणे, जगताप, गावंडे, कुरुंदकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी  आणि शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button