अकोला: खासदारसाहेब राजीनामा द्या : विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी | पुढारी

अकोला: खासदारसाहेब राजीनामा द्या : विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी

अकोला: पुढारी वृत्तसेवा : सत्तेत आल्यानंतर विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करु, असे आश्वासन देवून त्याची पूर्तता न केल्याने खासदार साहेब तुम्ही राजीनामा द्या, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली. याबाबत खासदार संजय धोत्रे यांना आज (दि. 11) निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे, की आपण व आपल्या पक्षाने, पक्षाच्या राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष केंद्रात सत्तेत आल्यास विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करु, असे लेखी व जाहीर अभिवचन विदर्भातील जनतेला दिले होते. मात्र, 2014 व 2019 साली केंद्रात सत्तेत येवूनही विदर्भातील जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतीक असलेले विदर्भ राज्य मिळवून देण्यास आपण, आपला पक्ष व आपले केंद्रातील सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.

त्यामुळे आपण खासदार म्हणून पदावर राहण्याचा अधिकार गमावला आहे. तरी तत्काळ आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे पाठवावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष सुरेश जोगळे, शंकर कवर, अरविंद तायडे, नितीन देशमुख, श्याम उमाळे, गुलाबराव म्हसाये, भास्कर तायडे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button