अकोल्‍यात जन्मदात्रीनेच केली २० दिवसांच्या बाळाची हत्‍या | पुढारी

अकोल्‍यात जन्मदात्रीनेच केली २० दिवसांच्या बाळाची हत्‍या

अकोला; पुढारी वृत्तसेवा : जन्मदात्या आईने 20 दिवसांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. या धक्‍कादायक घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चिमुकलीची आई लक्ष्मी भदे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

20 दिवसांच्या चिमुकलीची आई लक्ष्मी गजानन भदे (वय 26) ही वाडी अदमपूर येथील रहिवासी असून, तूर्तास ती अमरावती जिल्ह्यातील रामतीर्थ येथे तिच्या भावाकडे मुक्कामी आहे. 7 ऑक्टोबर रोजी चिमुकलीची प्रकृती बरी नसल्याने तिला तिची आई लक्ष्मी भदे व मुलीचा मामा सौरव बरिंगे यांनी उपचारासाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते.

त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मुलीला पुढील उपचारासाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता. मात्र यानंतर या बाळाचा मृत्‍यू झाल्‍याचे समोर आले. हे प्रकरण पोलिसांकडे गेल्‍यावर पोलिसांनी बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. बाळाचे शवविच्छेदन न्याय सहायक विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. त्यानुसार प्रकरण पुढील तपासासाठी तेल्हारा पोलिसात वर्ग करण्यात आले. त्यानुसार 9 ऑक्टोबरला आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू झाला. तेव्हा तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली.

मृत चिमुकलीचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे निष्पन्न

या तपासादरम्यान शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असता, त्यात मृत चिमुकलीचा मृत्यू हा गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाले. निष्पाप असलेल्या 20 दिवसांच्या चिमुकलीचा असा अंत झाल्याने कलम 302 अन्वये चिमुकलीची आई लक्ष्मी भदे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रमेश धामोडे करीत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button